मुंबई – भारतीय शेअर बाजार निर्देशांक कमालीच्या उच्च पातळीवर असूनही सोमवारी काही प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 60 हजार अंकांच्या वर कायम राहीला. मात्र बाजारात काही प्रमाणात करेक्शन होऊ शकते असे बोलले जात असून त्यामुळे खरेदी विक्रीच्या लाटा कायम राहण्याची शक्यता आहे.
बाजार बंद होतांना सेन्सेक्स केवळ 29 अंकांनी वाढून 60,077 या नव्या विक्रमी पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी केवळ 1 अंकांने वाढून 17,855 अंकांवर बंद झाला.
मारूती कंपनीचा शेअर 6 टक्क्यांनी वाढला. महिंद्रा, बजाज ऑटो, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ड्रीज, एचडीएफसी या कंपन्याच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र एचसीएल टेक, टेक महिंद्रा, बजाज फिन्सर्व्ह इन्फोसीस या कंपन्याच्या शेअरच्या भावात घट झाली.
जागतीक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर सकाळी शेअर बाजारात मोठी वाढ झाली होती. मात्र नंतर माहीती तंत्रज्ञान कंपन्याच्या शेअरची नफ्यासाठी विक्री झाल्यानंतर निर्देशांकाना ती पातळी राखता आली नाही. उत्सवाच्या काळात विक्री वाढण्याच्या शक्यतेमुळे वाहन कंपन्याच्या शेअरची बरीच खरेदी झाली. खरेदी विक्रीच्या लाटामुळे निर्देशांक दिवसभर अस्थिर राहीले.