Stock Market : सेन्सेक्‍सकडून 60 हजाराचे शिखर पादाक्रांत

अर्थव्यवस्थेबाबत गुंतवणूकदार कमालीचे आशावादी

मुंबई- जागतिक शेअर बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही गुंतवणूकदारांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर विश्वास दाखवून शेअर बाजारात तुफान खरेदी चालूच ठेवली. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक प्रथमच 60हजार अंकांच्या पुढे गेला. सेन्सेक्‍सने हा ऐतिहासिक विक्रम केल्याबद्दल शेअर बाजारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

सध्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आवश्‍यकतेपेक्षा जास्त उच्च पातळीवर असल्याची चर्चा चालू आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदार खरेदी करीत आहेत. शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 163 अंकांनी वाढून 60,048 या विक्रमी पातळीवर विराजमान झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 30 अंकांनी म्हणजे 0.17 टक्‍क्‍यांनी उसळून 17,853 अंकांवर बंद झाला.

31 वर्षांपूर्वी म्हणजे 25 जुलै 1990 रोजी सेन्सेक्‍स केवळ 1,000 अंकांवर होता. 4 मार्च 2015 मध्ये सेन्सेक्‍स 30 हजार अंकांवर होता. दरम्यानच्या काळामध्ये भारतामध्ये निरंतर आर्थिक सुधारणा होत गेल्या. भारतातील कंपन्यांची संख्या आणि कंपन्यांची उलाढाल वाढत गेली. केवळ गेल्या सहा वर्षात सेन्सेक्‍समध्ये 30 हजार अंकांची वाढ होऊन आता सेन्सेक्‍स 60 हजार अंकांवर गेला आहे. जानेवारी 2019 मध्ये सेन्सेक्‍स 50 हजारांवर होता.

शुक्रवारी एशियन पेंट्‌स, महिंद्रा, एचसीएल टेक्‌, एचडीएफसी बॅंक, एअरटेल, मारुती, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. मात्र टाटा स्टील, स्टेट बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, बजाज फायनान्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

वॉटरफिल्ड ऍडव्हायझर या कंपनीचे गुंतवणुक अधिकारी निमिश शहा यांनी सांगितले की, कंपन्यांचे बाजार मूल्य फुगले असल्याची भावना असली तरी गुंतवणूकदार भविष्याचा विचार करून गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येत आहे. देशात आणि परदेशात असलेली भांडवल सुलभता यामुळेही भविष्याचा वेध घेत गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असल्यामुळे निर्देशांकांची घोडदौड चालू आहे.

दूरसंचार, रिऍल्टी, तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, वाहन या क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर आरोग्य, धातू ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक पिछाडीवर राहिले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपना विक्रीचा मारा सहन करावा लागला. सरलेल्या आठवड्यात सेन्सेक्‍स 1032 अंकांनी तर निफ्टी 268 अंकांनी वाढला आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारताबाबत आशावादी झाले असून काल या गुंतवणूकदारानी 337 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली

“भारतीय अर्थव्यवस्थेत वाढीची किती क्षमता आहे, हे सेन्सेक्‍सने 60 हजार अंकांची पातळी ओलांडून दाखवून दिले आहे. भारताने करोनाचा सामना यशस्वीरित्या केल्यामुळे अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे.”
– अशिषकुमार चव्हाण,
व्यवस्थापकीय संचालक, मुंबई शेअर बाजार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.