मुंबई – भांडवल सुलभता वाढविण्यासाठी रिझर्व बँक या आठवड्यात जाहीर होणार्या पतधोरणात रोख राखीव प्रमाणात कपात करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे बँकांना अधिक भांडवल उपलब्ध होईल असे समजले जाते. परिणामी बुधवारी बँकांच्या शेअरची खरेदी वाढली. यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सलग चौथ्या दिवशी वाढण्यास मदत झाली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 110 अंकांनी वाढून 80,956 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी दहा अंकांनी म्हणजे 0.04 टक्क्यांनी वाढून 24,467 अंकावर बंद झाला. सरकारी बँकाबरोबरच एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक या खासगी कंपन्यांच्या शेअरच्या भावातही बुधवारी वाढ झाली.
जर रिझर्व बँकेने रोख राखीव प्रमाणात अर्धा टक्क्याची कपात केली तर पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक, ऑफ बडोदा, युको बँक इत्यादी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बँकांचे व्याजातील उत्पन्न वाढू शकते. फेडरल बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँकेला रोख राखीव प्रमाणात घट झाल्यास लाभ मिळणार आहे.
बँकांकडे ठेवीदारांच्या आलेल्या ठेवीतील विशिष्ट प्रमाणात म्हणजे रोख राखीव प्रमाणात रक्कम रिझर्व बँकेकडे ठेव म्हणून ठेवावी लागते. सध्या बँकांना या रकमेवर रिझर्व बँकेकडून व्याज मिळत नाही. भांडवल सुलभता वाढविण्यासाठी जर रोख राखीव प्रमाण कमी केले तर ही रक्कम बँकांना वापरण्यास मिळणार आहे.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून खरेदी –
दरम्यान शेअर बाजाराबाबत घडलेली एक सकारात्मक बाब म्हणजे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. या गुंतवणूकदारांनी मंगळवारी 3,664 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी जारी केली. जर या गुंतवणूकदारांनी खरेदी चालू ठेवली तर शेअर निर्देशांक सकारात्मक वाटचाल करू शकतील असे समजले जात आहे. आतापर्यंत देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी खरेदी करून शेअर निर्देशांकांना चांगलाच आधार दिला आहे.