मुंबई – एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेच्या विलीनीकरणामुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी सकारात्मक वातावरण होते. जागतिक बाजारातूनही तेजीचे संकेत आल्यानंतर दिवसभर जोरदार खरेदी होऊन शेअर बाजार निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,335 अंकांनी वाढून 60,611 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 2.17 टक्क्यांनी म्हणजे 382 अंकांनी उसळून 18,053 अंकांवर बंद झाला. निफ्टी पुन्हा 18,000 अंकांवर बंद झाल्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले.
विश्लेषकांनी सांगितले की देशातील सकारात्मक वातावरणाबरोबरच कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर जागतिक बाजारातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारातही जोरदार खरेदी झाली. एचडीएफसी आणि एचडीएफसी बॅंकेबरोबरच कोटक बॅंक, हिंदुस्तान युनिलिव्हर, इंडसइंड बॅंक, सन फार्मा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
जपान, दक्षिण कोरिया, हॉंगकॉंग आणि चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्यानंतर युरोपीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्याचे वृत्त आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात खरेदी वाढली. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आता भारतीय शेअर बाजारात खरेदी सुरू केली असल्याचे वातावरण आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारांमध्ये 1,909 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली.
रशिया- युक्रेन युद्ध आणि अमेरिकेच्या व्याजदर वाढीनंतर या गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये बरीच रक्कम काढून घेतली आहे. मात्र आता परिस्थिती सुधारत असल्याचे दिसून आल्यानंतर परदेशी संस्थागत गतवणूकदार भारतीय शेअर बाजारांमध्ये खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे.
जर या गुंतवणूकदारांनी खरेदीत चालू ठेवली तर आगामी काळामध्ये निर्देशांकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्राबरोबरच ऊर्जा, भांडवली वस्तू यासारख्या सर्व क्षेत्राचे निर्देशांक वाढले. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 1.68 टक्क्पर्यंत वाढ नोंदली गेली