मुंबई – गेल्या सहा दिवसात भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बऱ्याच गुंतवणूकदारांनी गुरुवारी नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेअर बाजार निर्देशांकात अल्प घसरांन झाली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 51 अंकांनी कमी होऊन 58,298 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी सहा अंकांनी कमी होऊन 17,382 अंकावर बंद झाला.
बॅंका, वित्तीय कंपन्या आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला असल्याचे दिसून येते. रिझर्व्ह बॅंकेचे पत धोरण शुक्रवारी जाहीर होणार असल्यामुळे आणि बॅंक व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार कुंपणावर बसून होते. दरम्यानच्या काळात रुपयाचे कालपासून बरेच अवमूल्यन झाल्यामुळे गुंतवणूकदार सावध होते.
एनटीपीसी, स्टेट बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्सिस बॅंक, पावर ग्रिड, कोटक महिंद्रा बॅंक, इंडसइंड बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांक कमी झाले. दरम्यानच्या काळात सन फार्मा, नेस्ले, इन्फोसिस, डॉक्टर रेड्डीज, विप्रो, महिंद्रा, टाटा स्टील या कंपन्यांच्या शेअरच्या भावात अडीच टक्क्यापर्यंत वाढ झाल्यामुळे निर्देशांकांची जास्त हानी झाली नाही.
आज आशियाई शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक होते. मात्र रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणामुळे भारतातील शेअर बाजारात सावध वातावरण होते.व्याजदराशी संबंधित कंपन्यांच्या शेअरची काही प्रमाणात विक्री झाली असल्याचे दिसून आले. मुख्य निर्देशांकात घट झाली असली तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप पाव टक्क्यापर्यंत वाढले. दूरसंचार, रिअल्टी या क्षेत्राचे निर्देशांकही कमी झाले तर आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, धातू या क्षेत्राचे निर्देशांक वाढले.
रिझर्व बॅंकेच्या पतधोरणाबरोबरच चीन तैवानबाबत काय भूमिका घेतो याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आह. त्यामुळे गुंतवणूकदारांनी काही काळ सावध राहून व्यवहार करावेत असे रेलिगेअर ब्रोकिंग या संस्थेचे विश्लेषक अजित मिश्रा यांनी सांगितले. भारतीय शेअर बाजारच्या दृष्टिकोनातून सकारात्मक बाब म्हणजे आता परदेशी संस्थागत गुंतवणूकदार खात्रीने भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. काल आणि आज रुपयाच्या मूल्यात घसरण होऊनही काल या गुंतवणूकदारांनी 765 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केल्याचे आकडेवारी शेअर बाजारानी जारी केले.