मुंबई – जागतिक बाजारातून काही प्रमाणात सकारात्मक संदेश येण्याबरोबरच बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची दिवसभर जोरदार खरेदी झाल्यामुळे बुधवारी शेअर बाजार निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ होण्यास मदत झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 616 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यांनी वाढून 53,750 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 178 अंकांनी वाढून 15,989 अंकावर बंद झाला.
बजाज फायनान्स आणि बजाज फिन्सर्व्ह या वित्तीय क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी सकाळी चमकदार ताळेबंद जाहीर केले. दोन्ही कंपन्यांच्या नफ्यात आणि उलाढालीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर आगामी काळातही नफा आणि उलाढाल वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे बॅंका आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी झाल्यामुळे शेअर बाजार निर्देशांक वाढण्यास मदत मिळाली.
कोटक बॅंक, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक या बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्याचबरोबर हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती सुझुकी, एशियन पेंट्स, टायटन, नेस्ले, महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली.
पावर ग्रीड, एनटीपीसी यासह सेन्सेक्ससंदर्भातील केवळ पाच मोठ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली असल्याचे दिसून आले. जागतिक बाजारात क्रुडचे दर काल 10 टक्क्यांनी कोसळले. त्याचबरोबर केंद्र सरकारने पेट्रोलियम कंपन्यावर विंडफॉल कर लावला आहे. त्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीच्या शेअरच्या भावात आजही घट झाली असल्याचे दिसून आले.