Stock Market : सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकांत घट

मुंबई – भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक उच्च पातळीवर असतानाच जागतिक बाजारात आर्थिक आघाडीवर बरेच नकारात्मक वातावरण तयार झाल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट नोंदली गेली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 286 अंकांनी कमी होऊन 59,126 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 93 अंकांनी कमी होऊन 17,618 अंकांवर बंद झाला.
जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, अमेरिकेत महागाई वाढण्याबरोबरच कर्ज रोख्यावरील परतावा वाढत आहे. डॉलर बळकट होत आहे. युरोप आणि चीनमध्ये वीज आणि ऊर्जा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. चीन मधील बांधकाम क्षेत्रात मंदीची शक्‍यता वाढली आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजारात नकारात्मक वातावरण आहे.

त्याचा परिणाम जागतिक शेअर बाजारावर होत आहे. याचा संसर्ग भारतीय शेअर बाजारांना झाला आहे. त्यातच डॉलर बळकट होऊन रोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतात केलेली गुंतवणूक परत घेण्यास सुरुवात केली आहे.

काल या गुंतवणूकदारांनी 1,896 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी उपलब्ध केली. मुख्य निर्देशांक कमी झाले असले तरी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मात्र अर्धा टक्‍क्‍यापर्यंत वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी रिऍल्टी, ग्राहक वस्तल, आरोग्य या क्षेत्राचे निर्देशांक वाढले तर बॅंकिंग धातू दूरसंचार या क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.