Stock Market : माहिती तंत्रज्ञान कंपन्या तेजीत; शेअर बाजार निर्देशांकांत वाढ

मुंबई – केंद्र सरकारने काल बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग संदर्भातील नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामुळे गुरुवारी माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे एक दिवसाच्या खंडानंतर शेअर बाजार निर्देशांक पुन्हा वाढले.

बाजार बंद होताना राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 103 अंकांनी म्हणजे 0.66 टक्‍क्‍यांनी वाढून 15,790 अंकावर बंद झाला. त्याचबरोबर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 392 अंकांनी वाढून 52,699 अंकावर बंद झाला.

इन्फोसिस कंपनीबरोबर टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक्‌, एशीयन पेन्टस्‌ या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. मात्र रिलायन्स कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा होऊनही कंपनीच्या शेअरचा भाव 2.35 टक्‍क्‍यांनी पडला.

भारती एअरटेल, पावर ग्रिड, स्टेट बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. या कामकाजाबाबत ब्रोकर्सनी सांगितले की, जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आले. त्याचबरोबर केंद्र सरकारने बीपीओसंदर्भात काही सकारात्मक सूचना जारी केल्या आहेत.

त्यामुळे भारतात आगामी काळात हा उद्योग वाढण्यास मदत होईल. या कारणामुळे दुपारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच बॅंकिंग, भांडवली वस्तू, क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात तीन टक्‍क्‍यापर्यंत वाढ झाली. तर ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, वीज, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्माल कॅप आणि मिड कॅप 0. 51 टक्‍क्‍यापर्यंत वाढले. काल मुडीज या पतमानांकन संस्थेने भारताचा विकास दर कमी होणार असल्याचे सांगितले होते. आज स्टॅंडर्ड अँड पुअर या कंपनीने भारताचा विकास दर कमी होणार असल्याचे सांगितले. मात्र तरीही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करुन खरेदी केली.

रुपयाचा भाव आज नऊ पैशांनी वाढला. त्यामुळे गुंतवणूकदारांना आधार मिळाला. शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून घडलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आता खरेदी करू लागले आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 3,156 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली असल्याची आकडेवारी शेअर बाजारांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.