Stock Market | निवडक खरेदीचा निर्देशांकांना आधार; ‘या’ शेअरची झाली खरेदी

मुंबई – गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळल्यामुळे आता बऱ्याच कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी पातळीवर आहेत. त्याचबरोबर लॉकडाउनच्या काळामध्ये जी क्षेत्र वाढतात अशा क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांकडून खरेदी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजार निर्देशांकांत अर्धा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली.

मात्र लवचिक परिस्थितीमुळे शेअर बाजारात खरेदी विक्रीच्या लाटा चालू आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 259 अंकांनी म्हणजे 0.53 टक्‍क्‍यांनी वाढून 48,803 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी गुरुवारी 76 अंकांनी वाढून 14,581 अंकांवर बंद झाला.

टीसीएस, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, ऍक्‍सिस बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इन्फोसिस, इंडसइंड बॅंक, मारुती, नेस्ले, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

याबाबत बोलताना अँजेल ब्रोकिंग या कंपनीचे विश्‍लेषक सूमित जैन यांनी सांगितले की, अपेक्षेप्रमाणे शेअर बाजारांमध्ये खरेदी-विक्रीच्या लाटा राहिल्या. मात्र शेवटच्या दोन तासांमध्ये बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाल्यामुळे निफ्टीला चांगला आधार मिळाला. त्यामुळे सोमवारी झालेल्या हानीची झिज काही प्रमाणात भरून निघू शकली. गुंतवणूकदारानी सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपन्यांच्या ताळेबंदाकडे पाहून निर्णय घेण्याची गरज आहे. निफ्टी वाढला तर 14,700अंकांपर्यंत वाढू शकतो. खालच्या पातळीवर निफ्टीला 14,350 वर आधार आहे.

रुपयाच्या मुल्यात सुधारणा
गेल्या आठवड्यात रूपयाची बरीच हानी झाली आहे. मात्र गुरुवारी रुपयाच्या मूल्यात 12 पैशाची सुधारणा होऊ शकली. आज रुपयाचा भाव 74.93 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. त्यामुळे शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. परकीय संस्थागत गुंतवणूकदार शेअर बाजारात खरेदी विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. कारण डॉलरचा भाव वधारत आहे. जर रुपयाचे मूल्य घसरत गेले तर भारताला आयात महाग महागात पडू शकते. अशा अवस्थेत देशात महागाई वाढण्याचा धोका वाढतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.