Stock Market | निर्देशांकांत माफक वाढ; वाढत्या रुग्ण संख्येचा गुंतवणूकदारांवर परिणाम

मुंबई, दि.6– मंगळवारी सकाळी शेअर बाजाराचे निर्देशांक बरेच वाढले होते. मात्र नंतर दिवसभर नफेखोरी झाल्यामुळे निर्देशांकांना ती पातळी राखता आली नाही. दिवसअखेर शेअर बाजार निर्देशांकांत माफक वाढ झाली.

सकाळी बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 646 अंकांनी वाढला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स 42 अंकांनी म्हणजे 0.09 टक्‍क्‍यांनी वाढून 49,201 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 45 अंकांनी वाढून 14,683 अंकांवर बंद झाला.

आजच्या खरेदीचा सर्वाधिक फायदा एशियन पेंट्‌स या कंपनीला झाला. या कंपनीचा शेअर 4 टक्‍क्‍यांनी वाढला. सनफार्मा, एचडीएफसी, डॉ. रेड्डीज, महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही वाढ झाली. मात्र पावरग्रिड, ऍक्‍सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.

रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारात सकाळी निर्देशांक उंचावले होते. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि इतर राज्यातून करोनाचे रुग्ण वाढत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सावध झाले आणि त्यांनी नफेखोरी केली. जोपर्यंत करोनाविषयक परिस्थिती निश्चित होत नाही, तोपर्यंत शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा येत राहतील असे त्यांनी सांगितले.

रुपयाच्या मूल्यावर परिणाम
काल शेअर बाजारात बरीच विक्री झाल्यानंतर रुपयाचे मूल्य 30 पैशांनी कमी झाले होते. रुपयाची घसरण आजही थांबली नाही. आज रुपयाचा भाव 12 पैशाने कमी होऊन 73.42 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला. मात्र भारताकडे परकीय चलनाचा बराच साठा असल्यामुळे या आघाडीवर भारताला चिंता करण्याचे कारण नाही असे विश्‍लेषकांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.