शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या जोरदार लाटा; शेअर निर्देशांकांत अल्प प्रमाणात घट

मुंबई, दि. 3- करोना रुग्णाच्या वाढत्या संख्येचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, त्याचबरोबर यातून अर्थव्यवस्था नेमकी कधी बाहेर येण्याची शक्‍यता आहे याचा अंदाज गुंतवणूकदारांना येत नाही. त्यामुळे शेअर बाजारामध्ये खरेदी-विक्रीच्या प्रचंड लाटा येत आहेत. सकाळी शेअर निर्देशांकात मोठी घट झाली होती. मात्र नंतर निवडक खरेदीही वाढली. शेवटी बाजार काही प्रमाणात कमी पातळीवर बंद झाल्याचे दिसून आले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स केवळ 63 अंकांनी कमी होऊन 48,718 अंकावर बंद झाला. त्या अगोदर सेन्सेक्‍स 750 अंकापर्यंत कोसळला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी मात्र सोमवारी केवळ तीन अंकांनी वाढून 14,634 अंगावर बंद झाला.

टायटन, इंडसइंड बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ऍक्‍सिस बॅंक, कोटक बॅंक, ओएनजीसी, आयटीसी, आयसीआयसीआय बॅंक यांना विक्रीचा फटका बसला. मात्र या परिस्थितीतही भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, मारुती, बजाज फायनान्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला.

बॅंकांच्या अनुत्पादक मालमत्तामध्ये वाढ होत आहे की काय अशी शंका वाटल्यामुळे बॅंकांच्या शेअरची आज विक्री झाली. मात्र धातू आणि ग्राहक वस्तू कंपन्यातीच्या शेअरची खरेदी वाढली होती असे रिलायन्स सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक विनोद मोदी यांनी सांगितले. जागतिक बाजारातही वातावरण कमालीचे मंद होते.

निफ्टीला 14, 500 वर आधार
आजच्या कामकाजाबाबत एलकेपी सिक्‍युरिटीज या संस्थेचे तांत्रिक विश्‍लेषण रोहित सिंगरे यांनी सांगितले की, अतिशय अनिश्‍चित परिस्थितीतही निफ्टी आज 14,600 च्यावर स्थिरावला. निफ्टी 14,800 च्या खाली असल्यानंतर तो अस्थिर राहणार आहे. 14,800च्या वर गेल्यानंतर मात्र तो स्थिर होण्याची शक्‍यता आहे. मात्र परिस्थिती बिघडत गेली तर निफ्टी 14,550 ते 14,500 पर्यंत घसरू शकतो. 14,500वर निफ्टीला चांगला आधार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.