Sotck Market : शेअर निर्देशांकात ‘घट’; गुंतवणूकदार अस्वस्थ

मुंबई – महागाई वाढण्याच्या शक्‍यतेमुळे अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील परतावा पुन्हा वाढला. त्यामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजार निर्देशांक घसरले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होऊन निर्देशांक एक टक्‍क्‍याने घसरले.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 1.16 टक्‍क्‍यांनी म्हणजे 598 अंकांनी कोसळून 50,846 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 164 अंकांनी कोसळून 15,080 अंकावर बंद झाला.

आज झालेल्या विक्रीचा फटका वित्तीय क्षेत्र आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना बसला. एचडीएफसी, एल अँड टी, स्टेट बॅंक, ऍक्‍सिस बॅंक, बजाज फिन्सर्व, एचडीएफसी बॅंकेला मोठ्या प्रमाणात विक्रीचा मारा सहन करावा लागला. आज ग्राहक वस्तू आणि औषधी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची थोडीफार खरेदी झाली.

रिलायन्स सिक्‍युरिटीजचे विनोद मोदी यांनी सांगितले की अमेरिकेतील 10 वर्षाच्या सरकारी रोख्यांवरील परतावा 0.6 टक्‍क्‍यांनी वाढल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजार निर्देशांक कमी झाले. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. आज धातू क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्राचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले.

मिड कॅप, स्मॉल कॅप वाढले
गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढल्यामुळे मुख्य निर्देशांक उच्च पातळीवर आहेत. मात्र छोट्या कंपन्यांया शेअरचे भाव तुलनेने कमी आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार छोट्या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करीत आहेत.

आज स्मॉल कॅप 0.48 टक्‍क्‍यांनी तर मिड कॅप 0.80 टक्‍क्‍यांनी वाढल्याचे दिसून आले. गुंतवणूकदार छोट्या निवडक कंपन्यांचे शेअर खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे, असे जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.