मुंबई – जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजार निर्देशांक कोसळत आहेत. त्यामुळे शुक्रवारी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 15 हजार अंकांखाली बंद झाला.
शुक्रवारी इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, डॉ. रेड्डीज, एनटीपीसी, आयसीआयसीआय बॅंक, बजाज फिन्सर्व या कंपन्यांच्या शेअरच्या भावात विक्रीमुळे घट झाली. मात्र या पडत्या काळातही ओएनजीसी, मारुती सुझुकी, कोटक बॅंक, नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली.
सेन्सेक्स संदर्भातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 440 अंकांनी म्हणजे 0.87 टक्क्यांनी कोसळून 50,405 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 142 अंकांनी कोसळून 14,938 अंकावर बंद झाला.
विश्लेषकांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा पुन्हा वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेसह जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक महागाई वाढण्याच्या शक्यतेने कमी झाले.
बॅंका आणि धातु क्षेत्राचे निर्देशांक कोसळले
गेल्या काही दिवसांमध्ये सरकारी बॅंका आणि धातू क्षेत्रांचे निर्देशांक बरेच वाढले होते. आता या दोन्ही क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरची विक्री वाढून या दोन्ही क्षेत्राचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले. सरकारी रोख्यावरील परतावा वाढल्यानंतर भांडवल सुलभता कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यता येऊ लागली आहे. त्यामुळे गुरुवारी परदेशी संस्थागत गुंतवणुकदारांनी 223 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.