Stock Market: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अमेरिका-इराण यांच्यातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, भारतीय शेअर बाजारात सोमवारी (२० एप्रिल २०२६) मोठा चढ-उतार पाहायला मिळाला. सलग दुसऱ्या सत्रात बाजार हिरव्या निशाण्यावर बंद झाला असला, तरी ही वाढ केवळ नावापुरतीच ठरली. विशेष म्हणजे, निर्देशांक किंचित वधारले असतानाही मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील विक्रीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १९ हजार कोटी रुपयांची घट झाली आहे. दिवसभराच्या रॅली आणि घसरणीनंतर बीएसई सेन्सेक्स २६.७६ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७८,५२०.३० वर आणि निफ्टी ११.३० अंकांच्या वाढीसह २४,३६४.८५ वर स्थिरावला. एकाच दिवसात १९,२८५ कोटी रुपयांचे नुकसान – (Stock Market) गुंतवणूकदारांच्या संपत्तीचा विचार करता, एकाच दिवसात १९,२८५.४९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. १७ एप्रिल रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४,६५,६४,४६१.५१ कोटी रुपये होते, जे आज बाजार बंद होताना ४,६५,४५,१७६.०२ कोटी रुपयांवर खाली आले. बाजारातील या अस्थिरतेमागे जागतिक घडामोडींचे मोठे कारण आहे. ओमानच्या खाडीत अमेरिकन नौदलाने इराणचे मालवाहू जहाज जप्त केल्याने आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील सुरुंग हटवण्यासाठी रोबोट तैनात केल्याने युद्धाची भीती वाढली आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिका आणि इराणमधील संभाव्य शांती चर्चेच्या आशेने बाजाराला कोसळण्यापासून वाचवले. Stock Market: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किरकोळ वाढ, पण ‘या’ कारणामुळे गुंतवणूकदारांचे 19 हजार कोटींचे नुकसान ३० पैकी १२ शेअर्स नफ्यात बंद – क्षेत्रनिहाय कामगिरी पाहता, आज ऑटो आणि सरकारी बँकांनी बाजार सावरण्याचा मोठा प्रयत्न केला, तर आयटी आणि रिअल्टी क्षेत्रात मोठी विक्री दिसून आली. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ १२ शेअर्स नफ्यात बंद झाले. यामध्ये ट्रेंट ३.३३ टक्क्यांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ एसबीआय, एशियन पेंट्स, एनटीपीसी आणि बजाज फायनान्स या शेअर्समध्ये तेजी राहिली. दुसरीकडे, एल अँड टी, भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), एचसीएल टेक आणि कोटक बँक यांसारख्या दिग्गज शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. कच्च्या तेलाच्या किमती ९५ डॉलर प्रति बॅरलच्या पार – जिओजित इन्व्हेस्टमेंटचे रिसर्च हेड विनोद नायर यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत पश्चिम आशियातील स्थिती स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती ९५ डॉलर प्रति बॅरलच्या पार गेल्या असून रुपयाच्या कमजोरीमुळे महागाईचा दबाव वाढण्याची भीती आहे. दरम्यान, आज बीएसईवर एकूण ४,५७८ शेअर्समध्ये व्यवहार झाला, ज्यामध्ये २,५४८ शेअर्स घसरणीसह बंद झाले, तर १८४० शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, बाजारातील या अनिश्चिततेतही १९९ शेअर्सनी त्यांच्या ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.