शेअर बाजार विकासाचे इंजिन – उदय कोटक

लॉकडाऊनच्या काळात कंपन्यांना भांडवल उभारता आले

नवी दिल्ली – भारतातील भांडवली बाजारानी गेल्या वीस वर्षांमध्ये देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका अदा केली आहे. लॅक डाऊनच्या काळामध्ये शेअर बाजार विकासाचे इंजिन ठरले आहे. अतिशय खडतर परिस्थितीत कंपन्यांना भांडवली गुंतवणूक करण्यासाठी शेअर बाजारातून निधी उपलब्ध होऊ शकला असे भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष उदय कोटक यांनी सांगितले.

लॉक डाऊनच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार दिलेल्या भांडवली बाजाराची वाढ निकोप आणि शाश्वत पद्धतीने होण्याची गरज आहे. त्यासाठी शेअर बाजारासंबंधातील सर्व नियंत्रक व्यवस्थांनी पूरक उपाययोजना करण्याची गरज आहे. सर्व कामकाज थंडावले असताना शेअर बाजाराचे कामकाज मात्र उत्तम पद्धतीने चालले.

याच काळात भारतीय कंपन्याना भांडवल उभारता आले. बाजार नियंत्रक सेबी आणि आणि कंपनी व्यवहार मंत्रालयाने या काळात बाजार व्यवस्थित चालावा यासाठी योग्य प्रयत्न केले. गुंतवणूकदार व कंपन्याचे हितसंबंधांचे संतुलितपणे जोपासण्याची कामगिरी या काळात नियंत्रकांनी केली आहे.

अनुत्पादक मालमत्ता वाढलेल्या मात्र शेअर बाजाराशी संबंधित असलेल्या कंपन्यांना लॉक डाऊनच्या काळामध्ये आपले अस्तित्व राखून ठेवता आले. भारतीय उद्योग महासंघाच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स या विषयावरील परिसंवादात बोलताना कोटक यांनी सांगितले की, आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला वेगाने वाटचाल करायची असेल तर भांडवली बाजार उत्तम रित्या चालण्याची गरज आहे.

याच कार्यक्रमात बोलताना एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केकी मिस्त्री यांनी सांगितले की, कंपन्यांचे व्यवस्थापन योग्य रीतीने चालत असल्याची खात्री झाल्यानंतर जागतिक गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करतील. यासाठी सुयोग्य व्यवस्थापनाकडे कंपन्यांबरोबरच बाजार नियंत्रकांनी लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी कंपन्याच्या स्वतंत्र संचालकांचे अधिकार वाढण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.