मुंबई – अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ऑक्टोबरपासूनच विक्री करण्यास सुरुवात केली होती. आक्टोबरपासून या गुंतवणूकदारानी 13.5 अब्ज डॉलरची (एक अब्ज डॉलर म्हणजे साडेसात हजार कोटी रुपये) गुंतवणूक काढून घेतली आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसने ही माहिती संकलित केली आहे. करोनाची तिसरी लाट आल्यानंतर बऱ्याच सावध गुंतवणूकदारांनी विक्री करणे सुरू केले असल्यामुळे निर्देशांक सध्या कमी पातळीवर गेले आहेत. यामध्ये पादेशी गुंतवणूदारांचा मोठा वाटा असल्याचे समजले जाते. ऑक्टोबर 2021 पासून राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आठ टक्क्यांनी कमी झाला आहे.
शेअर निर्देशांक तेजीत असताना तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात आले होते. त्यांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र आता तंत्रज्ञान कंपनीचे शेअर मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
परदेशी संस्थागत गुंतवणूकदार अस्वस्थ होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के क्रुड आयात करतो. त्यामुळे भारताला यासाठी परकीय चलन मोजावे लागेल. भारताची तूटही 6.8 टक्के आहे. त्यामुळे आगामी काळात भारतात महागाई वाढण्याची शक्यता या गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे पुढील 6 महिने तरी खरेदी-विक्रीच्या लाटा येत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.