मुंबई -करोनाच्या दुसऱ्या लाटेचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाबरोबरच शेअर बाजारातील गुंतवणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
गोल्डमन सॅक्स या संस्थेने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की 2021-22 व्या वर्षात विकास दर 10.9 टक्के होईल असे आम्ही म्हटले होते. मात्र सध्याची परिस्थिती पाहता हा विकास दर 10.5 टक्के इतका होऊ शकतो. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, गुजरात या औद्योगिकरण झालेल्या मोठ्या राज्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्थूल आणि सुक्ष्म अर्थव्यवस्थेवरही परिणाम शक्य आहे.
त्यामुळे गुंतवणूकदार या परिस्थितीचा अभ्यास करून आगामी काळात निर्णय घेण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे जून अखेरच्या तिमाहीमध्ये विकास दरावर बराच परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळात परिस्थिती वेगाने सुधारली तर दुसऱ्या तिमाहीमध्ये झालेली झीज भरून काढण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. गुंतवणूदारांच्या मनामध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी उच्चांकी पातळीवरून सात टक्क्यांनी कमी झाला आहे.
सोमवारी एकाच दिवसात निफ्टी साडेतीन टक्क्यांनी घसरला होता. मात्र सरसकट लॉकडाउन लागू करण्यात आले नाही ही समाधानाची बाब असल्याचे या टिपणात म्हटले आहे. या संस्थेने सध्याच्या परिस्थितीमध्ये निफ्टी डिसेंबरपर्यंत 16,300 पर्यंत वाढवू शकतो असे म्हटले आहे. या अगोदरच्या टीपणामध्ये निफ्टी डिसेंबरपर्यंत 16,500 पर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र सर्व काही करोनाच्या वाटचालीवर अवलंबून आहे.
हॉटेल, प्रवास, मनोरंजन क्षेत्रांवर जास्त परिणाम
मॅन्युफॅक्चरींग आणि इतर क्षेत्रांवर परिणाम फारसा होणार नसला तरी हॉटेल, प्रवास, मनोरंजन इत्यादी क्षेत्रावर निश्चित परिणाम होणार आहे असे या संस्थेने म्हटले आहे. मात्र जेव्हा करोनाविषयक परिस्थिती निवळेल तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था अधिक वेगाने पुढे जाईल या मताचा त्या टिपणात पुनरुच्चार करण्यात आला आहे. अल्प पल्ल्यामध्ये परिस्थिती निराशाजनक आहे. मात्र मध्यम आणि दीर्घ पडल्ल्यात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाईल असे सांगण्यात आले.