मुंबई – दुसर्या कोसळलेल्या विकासदराच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे पतधोरण शुक्रवारी सादर होणार आहे. याबाबत गुंतवणूकदार आशावादी आहेत. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी होऊन निर्देशांक एक टक्क्याने वाढले. गेल्या पाच दिवसापासून निर्देशांक वाढत आहेत.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 809 अंकांनी वाढून 81,765 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 240 अंकांनी म्हणजे 0.98 टक्क्यांनी वाढून 24,708 अंकावर बंद झाला. अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारली आहे. त्यामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची अमेरिकेला निर्यात वाढेल या आशाने माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरच्या भावात आजही वाढ झाली.
टीसीएस, टायटन, इन्फोसिस, एअरटेल, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर एनटीपीसी व एशियन पेंट्स कंपन्यांचे शेअर पिछाडीवर होते. अमेरिकेतील डाऊ जोन्स हा मुख्य निर्देशांक प्रथमच 45 हजार अंकावर गेला आहे.
अमेरिकेचे स्थूल अर्थव्यवस्था बळकट असल्यामुळे अमेरिकेत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. जिओजित वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विजय कुमार यांनी सांगितले की, अमेरिकेतील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढल्यानंतर जगातील इतर शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
मिडकॅप 0.27 टक्क्यांनी, स्मॉल कॅप 0.16 टक्क्यांनी वाढले. शेअर बाजारातील 2,141 कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. 1,825 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा निर्देशांक दोन टक्क्यांनी वाढला. दूरसंचार, बँकिंग, ग्राहक वस्तू या क्षेत्राचे निर्देशांक आघाडीवर होते. फक्त बांधकाम क्षेत्राचा निर्देशांक काही प्रमाणात कमी झाला. गेल्या पाच दिवसात शेअर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 3.44 टक्क्यांनी म्हणजे 2,722 अंकांनी वाढला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी –
विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यापासून विक्री करीत असलेले परदेशी संस्थागत गुंतवणूकदार आता भारतीय शेअर बाजारात खरेदी करीत असल्याचे वातावरण आहे. बुधवारी या गुंतवणूकदारांनी 1,797 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. जर रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीसह रोख राखीव प्रमाणात काही प्रमाणात घट केली तर शेअर बाजार निर्देशांक आणखी वाढण्याची शक्यता विश्लेषक व्यक्त करीत आहेत.