मुंबई – जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश येत असतानाच परदेशी गुंतवणूकदाराकडून भारतीय शेअर बाजारात खरेदी चालू असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक आगेकूच करीत आहेत. शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकामध्ये भरघोस वाढ नोंदली गेली.
सायंकाळी औद्योगिक उत्पादन आणि महागाईची आकडेवारी जाहीर होणार होती. त्यामुळे काही गुंतवणूकदार आशावादी झाले होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 130 अंकांनी वाढून 59,462 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 39 अंकांनी म्हणजे 0.22 टक्क्यांनी वाढून 17,698 अंकांवर बंद झाला.
शेअर बाजारात रेंगाळलेल्या तेजीबाबत बोलताना विश्लेषकानी सांगितले की, अमेरिका व्याजदरात जास्त वाढ करणार नाही कारण अमेरिकेतील महागाईचा दर साडेआठ टक्क्यांवर आला आहे. गेल्या महिन्यात तो नऊ टक्क्यांच्या पुढे होता. त्यामुळे फेडरल रिझर्व्ह आगामी काळामध्ये जास्त व्याजदर वाढ करणार नाही असे दिसून येत असल्यामुळे अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील देशातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले.
रुपयाचे मूल्य स्थिर होत असून आता डॉलरची पीछेहाट होऊ लागल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात आक्रमकपणे गुंतवणूक करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी तब्बल 298 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. गेल्या एक आठवड्यापासून या गुंतवणूकदारानी भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे निर्देशांक वाढले असल्याचे दिसून आले.
शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, एनटीपीसी, टाटा स्टील, पावर ग्रीड, स्टेट बॅंक, आयटीसी या कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली तर इन्फोसिस, मारुती, एल अँड टी, टेक महिंद्रा, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली.
असे असले तरी माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते.
सायंकाळी औद्योगिक उत्पादन आणि महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी त्याचा परिणाम शेअर बाजारातील व्यवहारावर होऊ शकतो. दरम्यान क्रूडचे दर काही प्रमाणात वाढून 100 डॉलरवर गेल्यामुळे थोडेसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.