मुंबई – करोना व्हायरसच्या केसेस वाढत असल्या तरी लस येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार खरेदी करीत असल्यामुळे निर्देशांकांत वाढ होत आहे.
सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 398 म्हणजे 1.08 टक्क्यांनी वाढून 37,478 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 120 अंकांनी वाढून 11 हजारांच्या पुढे म्हणजे 11,022 अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीचे नेतृत्व माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय कंपन्यांनी केले.
आज बजाज फायनान्स, टेक् महिंद्रा, एचडीएफसी बॅंक आघाडीवर राहिल्या तर सनफार्मा, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बॅंक पिछाडीवर राहिल्या. एचडीएफसी बॅंकेने चांगला ताळेबंद जाहीर केल्यामुळे एचडीएफसी बॅंकेच्या शेअरच्या भावात आज 3 टक्के वाढ झाली.
मात्र ग्लेनमार्क कंपनीच्या औषधाच्या योग्यतेबाबत औषध नियंत्रकांनी या कंपनीकडे स्पष्टीकरण मागितल्यामुळे ग्लेनमार्क कंपनीच्या शेअरच्या भावात आज घट झाली. ग्लेनमार्क कंपनीचे फॅबीफ्लू औषध मतभेदाचा मुद्दा आहे. या औषधाच्या किमतीवरून औषध नियंत्रकांनी या कंपनीकडे विचारणा केली आहे.