नव्या मंत्रिमंडळाला गुंतवणूकदारांचा सलाम; शेअरबाजार निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर

मुंबई – रालोआ सरकारला पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून शेअरबाजाराचे निर्देशांक वाढत आहेत. गुरुवारी संध्याकाळी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असतानाच शेअरबाजारात दिवसभर बरीच खरेदी होऊन निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले.

गुरुवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 329 अंकांनी म्हणजे 0.84 टक्‍क्‍यांनी वाढून 39,831 या नव्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 84 अंकांनी वाढून 11,945 अंकांवर बंद झाला

आजच्या तेजीचा फायदा ऊर्जा, दूरसंचार, वित्त, बॅंकिंग क्षेत्राला झाला. त्या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे 1.58 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला. मात्र धातू आणि रिऍल्टी क्षेत्रातील कंपन्यांना नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजारातील मिडकॅप व स्मॉल कॅपमधील कंपन्यांना तेजीचा लाभ होऊन त्या क्षेत्राचे निर्देशांक 0.45 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

जागतिक परिस्थिती खराब असली तरी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांचा विश्‍वास आता वाढू लागला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून हे गुंतवणूकदार भारतीय शेअरबाजारात बऱ्यापैकी खरेदी करत आहेत. बुधवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअरबाजारात तब्बल 1664 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

मात्र बुधवारी देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1122 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला.
विश्‍लेषकांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. नवे सरकार आल्यामुळे खरेदी करण्यास मर्यादा आहेत. कंपन्यांचे ताळेबंद, केंद्र सरकारचा अर्थसंकल्प त्याचबरोबर केंद्र सरकार घेणार असलेल्या नव्या निर्णयाच्या आधारावर गुंतवणूकदारांनी आपले खरेदी- विक्री करण्याचे निर्णय ठरवावेत असे विश्लेषकांनी गुंतवणूकदारांना सांगितले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×