मुंबई – सोमवारी सकाळच्या सत्रात निर्देशांकांची बरीच हानी झाली होती. मात्र दुपारी जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर बरीच निवडक खरेदी झाल्याने निर्देशांकामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 231 अंकांनी वाढून 57,593 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी वाढून 17,222 अंकांवर बंद झाला.
रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बॅंक, एअरटेल या कंपन्यांबरोबरच ऍक्सिस बॅंक, स्टेट बॅंक, इंडसइंड बॅंक, बजाज फिन्सर्व, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र नेस्ले, एचडीएफसी,डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट, विप्रो या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
जिओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक व्हि के विजयकुमार यांनी सांगितले की, रशिया- युक्रेन युद्धाचा शेअर बाजारावरील परिणाम आता कमी होऊ लागला आहे. या संदर्भातील सर्व बाबी विचारात घेऊन या अगोदरच गुंतवणूकदारांनी पाहिजे ते निर्णय घेतले आहेत.
मात्र आता अमेरिकेची भविष्यातील व्याजदरवाढ निर्देशांकांची पुढील दिशा ठरविण्याची शक्यता आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा स्माल कॅप 0. 53 टक्क्यानी व मिड कॅप 0.5 40 टक्क्यांनी कमी झाला.
दरम्यान, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची विक्री चालूच असून शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 1,507 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली. पुढील पंधरवाड्यात रिझर्व बॅंकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. त्याकडे गुंतवणूदारांचे लक्ष राहण्याची शक्यता आहे.