मुंबई – आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीला 27 मार्च पासून परवानगी देण्यात आल्यामुळे भारतातील नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या शेअरच्या भावात बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. इंडिगो कंपनीचा शेअर 9 टक्क्यांनी वाढून 1,826 रुपयांवर गेला.
स्पाइस जेट कंपनीच्या शेअरचा भाव साडेसह टक्क्यांनी वाढून 60 रुपयांवर गेला आहे. लॉक डाऊनमुळे मार्च 2000 पासुन आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर निर्बंध घालण्यात आले होते. दरम्यानच्या काळामध्ये विमानाच्या इंधनाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे विमान कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला होता.
आता पुन्हा जागतिक पातळीवर विमानसेवा सुरू होणार असल्यामुळे विमान कंपन्यांचा नफा वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की,आता एअर बबल यंत्रणा काढून टाकण्यात येणार आहे.
एअर बबल काढून टाकून जागतिक विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल देशातील नागरी विमान वाहतूक कंपन्यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर विमानाच्या इंधनाचे दर कमी करण्याची आवश्यकता असून या विषयावर सरकारने विचार करावा अशी सूचना करण्यात आली.