Stock Market | खरेदी-विक्रीच्या लाटानंतर निर्देशांकात अल्प वाढ; मिड कॅप व स्मॉल कॅप उंचावले

मुंबई – एकीकडे रिझर्व बॅंकेने विकास दर वाढण्यासाठी पूरक पतधोरण जाहीर केले असतानाच दुसरीकडे जगभर करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे संभ्रमीत असलेल्या गुंतवणूकदारांकडून खरेदीबरोबर विक्री चालू आहे. त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकांत अल्प वाढ झाली.
समाधानाची बाब म्हणजे सलग तिसऱ्या दिवशी निर्देशांकांत वाढ झाली आहे. आजच्या कामकाजाचे वैशिष्टय म्हणजे मुख्य निर्देशांकापेक्षा मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जास्त वाढ झाली.

बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 0.17 टक्‍क्‍यांनी म्हणजे 84 अंकांनी वाढून 49,746 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 54 अंकांनी वाढून 14,873 अंकांवर बंद झाला.

आज धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरचे भाव चार टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा कंपन्याकडेही गुंतवणूकदारांचा ओढा होता. रुपयाचे मूल्य बऱ्याच प्रमाणात कोसळले आहे. त्यामुळे निर्यात करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला याचा फायदा होऊ शकतो.
यामुळे माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. मुख्य निर्देशांक जरी कमी प्रमाणात वाढले असले तरी गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा मिड कॅप आणि स्मॉल कॅप 0.5 टक्‍क्‍यापर्यंत वाढला.

जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, टायटन कंपनी, हिंदाल्को या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. तर इंडसइंड बॅंक, स्टेट बॅंक, लाइफ इन्शुरन्स, सन फार्मा, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला. मुंबई शेअर बाजारातील अंबुजा सिमेंट, एनएमडीसी, जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यासह 200 कंपन्यांच्या शेअरचे भाव 52 आठवड्याच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

14,950 ची पातळी महत्त्वाची
कामकाजाबाबत दिनदयाळ इन्वेस्टमेंटचे विश्‍लेषक मनीष हाथरमानी यांनी सांगितले की, शेअरबाजारात करोनामुळे खरेदी-विक्रीच्या लाटा चालू आहेत. आज निफ्टीने 14,950 ची महत्वपूर्ण पातळी ओलांडली. मात्र ती निफ्टीला कायम ठेवता आली नाही. जर निफ्टी 14,950 अंकाच्या वर गेला तर निफ्टी पुढे वाढण्याची शक्‍यता आहे. अशा अवस्थेत निफ्टी 15,300 ते 15,400 अंकांपर्यंत वाढू शकतो. खालच्या पातळीवर निफ्टीला 14,500 वर चांगला आधार आहे, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.