Stock Market: शेअर बाजारात उत्सवाचे वातावरण; निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने उदार पतधोरण जाहीर केले आहे. त्याचबरोबर भारताची निर्यात वाढली आहे. या कारणामुळे निर्देशांक उच्च पातळीवर असूनही गुंतवणूकदारांनी काही प्रमाणात खरेदी केल्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक नव्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.

जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येऊनही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूकदांराकडून खरेदी चालू राहिली. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 76 अंकांनी वाढून 60,135 अंकांवर विराजमान झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 50 अंकांनी म्हणजे 0.28 टक्‍क्‍यांनी वाढून 17,945 अंकांवर बंद झाला.

एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, आयटीसी या कंपन्यांबरोबरच मारुती सुझुकी, पॉवर ग्रीड, आयटीसी, एनटीपीसी, स्टेट बॅंक, महिंद्रा, कोटक बॅंक, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र टिसीएसने बऱ्यापैकी ताळेबंद जाहीर करूनही टीसीएस कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्‍क्‍यांनी कमी झाला.

निर्देशांकांची आगेकूच चालू असल्याबद्दल आनंद राठी या संस्थेचे संशोधन प्रमुख नरेंद्र सोळंकी यांनी सांगितले की, भारतातील लसीकरण वेगाने वाढत असल्यामुळे भारतीय प्रवाशांना इतर देशात प्रवास करण्याची परवानगी मिळत आहे. दरम्यानच्या काळामध्ये निर्यात वाढली अवल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. भारताची निर्यात 197 अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे.
यामुळे वाहन, रिऍल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केली. समाधानाची बाब म्हणजे रुपया सध्या कमकुवत होत असूनही परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मात्र खरेदी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात आत्तापर्यंत 1,997 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी या गुंतवणूकदारांनी केली आहे.

मात्र भारताच्या दृष्टीकोनातून चिंतेचा एक विषय म्हणजे कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दर 84 डॉलर प्रति पिंपापर्यंत वाढले आहेत. त्याचबरोबर भारतात सध्या कोळशाची टंचाई निर्माण झाल्यामुळे आगामी काळामध्ये गुंतवणूकदार सावध राहून व्यवहार करण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.