मुंबई – अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी झाल्यानंतर जागतिक शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले. त्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पुन्हा 51 हजारावर बंद झाला.
अमेरिकेसह विविध देशांच्या सरकारी रोख्यांवरील परतावा वाढत असल्यामुळे गेल्या आठवड्यात शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले होते. अमेरिकन संसदेने नव्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील रोजगारात वाढ झाली आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 584 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यानी वाढून 51,025 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 142 अंकांनी वाढून 15 हजार अंकांच्या वर म्हणजे 15,098 अंकांवर बंद झाला.
खासगी बॅंका, माहिती-तंत्रज्ञान, ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मंगळवारी जोरदार खरेदी झाली. जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, आज बाजारातील अस्थिरता कमी झाली. कोटक बॅंक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मात्र पॉवर ग्रीड, ओएनजीसी, एनटीपीसी या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
आजच्या कामकाजाचे वैशिष्ट म्हणजे मुख्य निर्देशांक वाढले तरी मिडकॅप आणि स्मॉल कॅप अनुक्रमे 0.66 व 0.41 टक्क्यांनी कमी झाले. गेल्या आठवड्यात मिड कॅप आणि स्मॉल कॅप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आज या कंपन्यांच्या शेअरची नफ्यासाठी विक्री झाली.
गुंतवणूकदारांचे लक्ष वाढत असलेल्या क्रुडच्या किमतीकडे आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्यामुळे आणि तेल उत्पादक देशानी तेलाचे उत्पादन स्थिर ठेवल्यामुळे सध्या क्रुडचे दर वाढत आहेत. भारतावर वाढणाऱ्या क्रुडच्या दराचा जास्त परिणाम होतो. कारण भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के इतके क्रुड आयात करतो. सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त पातळीवर असल्यामुळे ग्राहकात असंतोष आहे.