मुंबई – महागाई रोखण्यासाठी देश-विदेशातील रिझर्व्ह बॅंका प्रयत्न करीत असतानाच निराश गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री चालूच आहे. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली. माहिती तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक मंगळवारी कोसळले. मात्र बॅंकिंग आणि वाहन क्षेत्राचे निर्देशांक वाढले. पोलादाचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही अप्रत्यक्ष उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर इंधनाचे दर कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्राचे निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 236 अंकांनी कमी होऊन 54,052 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 89 अंकांनी कमी होऊन 16,125 अंकांवर बंद झाला. रुपयाचे मूल्य कमकुवत होत आहे. त्याचबरोबर जागतिक गुंतवणूकदारांकडून भारतीय शेअर बाजारात विक्री चालू असल्यामुळे निर्देशांक कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
आज सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 20 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घसरण झाली. टेक महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, एनटीपीसी, इन्फोसिस, टाटा स्टील, ऍक्सिस बॅंक या कंपन्यानी सपाटून मार खाल्ला. एचडीएफसी, कोटक महिंद्रा बॅंक, पावर ग्रिड, नेस्ले या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. महागाई किती वाढेल, ती कधी कमी होईल या शंका गुंतवणूकदारांच्या मनात सतावत आहेत.
युरोप आणि ब्रिटनमधील उद्योगांची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी आज जाहीर झाली. मुख्य निर्देशांका बरोबर आहे मॉल कॅप 1.14 टक्क्यांनी तर मिड कॅप 0.85 टक्क्यानी घसरला. देश-विदेशातील गुंतवणूकदारांत व्याज दर किती वाढणार याबाबत चर्चा चालू आहे. अमेरिकेच्या रिझर्व बॅंकेच्या पतधोरण समितीचे इतिवृत्त लवकरच जाहीर होणार आहे. त्यावरून गुंतवणूकदारांना आगामी काळातील व्याजदर वाढीचा अंदाज येऊ शकेल. जागतिक गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून काल 1,951 कोटी रुपये काल काढून घेतले.