वेळवंडी नदीवरील अद्याप पूल पाण्याखाली

भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

– दत्तात्रय बांदल

भाटघर – भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती केंद्राशेजारी एकूण चार पूल असून, वेळवंडी नदी व नीरा नदी यांच्या संगमाच्या ठिकाणी दोन पूल आहेत. एक वेळवंडी नदीवर व दुसरा नीरानदीवर बांधलेला आहे. हे दोन्ही पूल ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झालेले आहेत. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने भोर तालुक्‍यातील सर्व पूल पाण्याखाली गेले होते. बाकी सर्व पुलावर असणारे पाणी कमी झाले, तसेच सर्व पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले; परंतु एक महिना उलटला तरी अजून हे दोन पूल पाण्याखालीच आहेत. अजून एक महिना तरी पूल पाण्याखाली राहण्याची शक्‍यता आहे.

या दोन्ही पुलाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने हे पूल सद्यःस्थितीत पाण्याखाली आहेत किंवा वाहुन गेले आहेत याची शाश्‍वती कुणालाही देता येत नाही. भाटघर जलविद्युत वीज निर्मिती केंद्राशेजारी वेळवंडी व नीरा नदी या दोन्ही नद्यांचा संगम होतो. याठिकाणी पहिला पूल वेळवंडी नदीवर बांधलेला असून तो ब्रिटिशकालीन आहे. या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून पुलावरील दोन्ही बाजूचे पाच ते सहा फुटांचा सिमेंट कॉंक्रिटचा भाग वाहून गेला आहे. याखालील मुरूम उन्हाळा हंगामामध्ये दिसून येत होता. पूर्वीच्या काळी या पुलावरून चारचाकी वाहन सहजरीत्या जात होते; परंतु अलीकडच्या काळात या पुलावरून फक्त दुचाकी वाहन जात आहेत.

पुलाला दगडी खांबांचा आधार असला तरी डागडुजी अभावी दगड निखळत आहेत. संगमनेर व माळवाडी येथील शेतकरी शेळ्या व जनावरे घेऊन चाऱ्याच्या शोधात या पुलावरून जात असतात, परंतु आता सद्यःस्थितीत हा पूल पाण्याखाली गेल्याने शेळ्या व जनावरांना येथूनच माघारी फिरावे लागत आहे. नीरा नदी व वेळवंडी नदी यांच्या संगमाच्या ठिकाणी नीरा नदीवर पूल बांधलेला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन असून, धोकादायक झालेला आहे. या पुलाची लांबी मोठी असली तरी उंची कमी आहे.

दरवर्षी नीरा देवघर धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पूल पाण्याखाली जात आहे. किमान दोन महिने तरी पूल पाण्याखाली राहतात. हा पूल स्टील व सिमेंट कॉंक्रिटचा वापर करून बांधलेला आहे. उन्हाळ्यामध्ये पुलावरील सिमेंटचा काही भाग वाहून गेल्याने स्टील उघडे पडलेले दिसून येत होते. या पुलावर हे अनेक ठिकाणी खड्डे पडलेले दिसून येत होते. पूल पाण्याखाली गेल्याने हरतळी व माळवाडीकडील पर्यायी मार्गाचा संपर्क तुटला आहे.

अधिकाऱ्यांचे उडवाउडवीचे उत्तरे 
भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हारतळी व माळवाडी गावचा पर्यायी मार्ग बंद होणार आहे, तर माळवाडी गावापासून पॉवर हाउसकडे जाताना तिसरा पूल अरुंद असून त्याचे संरक्षक कठडे गायब झाले आहेत. या पुलावरून वाहन खाली कोसळण्याची शक्‍यता आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित जाणूनबुजून अधिकारी कानाडोळा करीत आहेत. वाहन पुलावरून खाली कोसळल्यास अनेकांना आपला जीव गमवावा लागणार आहे. धोकादायक पुलाची माहिती घेण्यासाठी पॉवर हाऊस येथील कार्यालयात पत्रकार गेले असताना संबंधित अधिकारी भेटण्यास टाळाटाळ करतात, तर फोन केला असता ट्रॉफिकमध्ये आहे, बिझी आहे असे सांगून उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

सद्यःस्थितीत पूल आहे की नाही?
सदरचे दोन्ही पूल एक महिन्यापासून पाण्याखाली आहेत की वाहून गेले आहेत, अशी शंका निर्माण झाली आहे. भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती शेजारील एकूण चार पुलांपैकी सर्वच पूल धोकादायक झाले आहेत. पूर्वी हे सर्व पूल व माळवाडीपासून ते भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती केंद्रापर्यंतचा रस्ता जलसंपदा विभागाकडे होता, परंतु साधारणत: आठ महिन्यांपासून भाटघर जलविद्युत वीजनिर्मिती केंद्राकडे वर्ग करण्यात आला आहे. सदरचा रस्ता व धोकादायक पूल याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.

हा रस्ता व पूल याचे अधिकार आठ महिन्यांपूर्वी भाटघर जलविद्युत वीज निर्मितीकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामुळे याबाबत आमच्याकडे अधिकार राहिले नसल्याने आम्हाला लक्ष देता येत नाही.
– अनिल नलावडे, शाखा अभियंता, भाटघर प्रकल्प विभाग

Leave A Reply

Your email address will not be published.