पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासामध्ये मतदारांनी एकजुटीने मला साथ दिली. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे पूर्ण झाली असून, अजूनही आपल्याला ध्येय गाठायचे आहे. सिंहगडावर जाण्यासाठी “रोप’वे, चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपुल, डेक्कन ते खडकवासला आणि कात्रज ते चांदणी चौक मेट्रो महामार्ग यासह अनेक कामे मार्गी लावण्याचा संकल्प असल्याचे महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर यांनी व्यक्त केले.
मागील 4 दिवसांपासून भीमराव तापकीर यांनी प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून, त्यांच्याशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्यासाठी धनकवडी, आंबेगाव, नऱ्हे, भुसारी कॉलनी, वेदभवन, बावधन, वारजे, कर्वेनगर या भागांत पदायात्रा काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांसह तरूण आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. दरम्यान, भीमराव तापकीर यांच्या कार्यांचा लेखाजोखा “पंख प्रगतीचे’ या शीर्षकाखाली नुकताच प्रसिद्ध झाला. त्यामध्ये तब्बल 1 हजार 200 कोटी रुपयाहून अधिक रकमेचा विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
चांदणी चौकातील बहुमजली उड्डाणपूल, खडकवासला मतदारसंघातील शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते कॉंक्रिटचे करणे, शिवणे ते कोंढवे धावडे रस्ता रूंदीकरण, मेट्रो महामार्ग, वडगांव (नवले पूल) ते कात्रज चौक रस्त्याचे सहापदरीकरण, या मार्गावर राजस सोसायटी येथे उड्डाणपूल उभारणे हेच आपले ध्येय आहे. तसेच, राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ, सबका विकास’ या तत्वानुसार एकजुटीने काम करायचे आहे, त्यासाठी तुमची साथ कायमच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.