मुंबई- रिझर्व बॅंकेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदरात मोठ्या प्रमाणात कपात करून इतर अनेक उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी शेअर बाजार निर्देशांकात मात्र शुक्रवारी घट नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स शुक्रवारी 260 अंकांनी म्हणजे 0.84 टक्क्यानी कमी होऊन 30,672 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 67 अंकानी कमी होऊन 9,039 अंकांवर बंद झाला.
रिझर्व बॅंकेने व्याजदरात कपात केली असल्यामुळे बॅंकांच्या नफ्यावर परिणाम होणार असल्यामुळे बॅंका आणि वित्तीय क्षेत्राच्या शेअरची आज मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्याचा परिणाम ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, बजाज फिन्सर्व, आयसीआयसीआय बॅंक, टाटा स्टील, बजाज ऑटो, एचडीएफसी बॅंक, बजाज फायनाप्स, आयसीआयसीआय ब:ंक, टाटा स्टील, बजाज ऑटो आणि इंडसइंड बॅंकेवर झाला.
अशा परिस्थितीतही महिंद्रा, इन्फोसीस, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. रिझर्व बॅंकेने सध्या व्याजदर वीस वर्षाच्या नीचांकी पातळीवर आणले आहेत. सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांनी कर्ज घेऊन खर्च करावा अशी रिझर्व बॅंकेची इच्छा यातून दिसून येते. त्याचबरोबर रिझर्व बॅंकेने कर्जाचा हप्ता देण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना हेड कॅपिटल मार्केट्स स्टॅटेजी या कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरव दुआ यांनी सांगितले की, रिझर्व बॅंकेने व्याजदरात कपात केली असली तरी बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कशी हाताळले जाईल याबाबत रिझर्व्ह बॅंकेने कसलेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. आज जागतिक बाजारातील शेअर बाजाराचे निर्देशांकां कमी झाले. जागतिक बाजारात आज क्रुडचे दर चार टक्क्यांनी घसरून 34 डॉलर प्रति पिंप या पातळीवर गेले. भारतीय रुपयाचा दर शुक्रवारी 34 पैशांनी कमी होऊन तो 75.95 रुपये प्रति डॉलर या पातळीवर गेला.