एका वर्षात 52 हजारांवर कारवाई
वाढते अपघात : वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे ठरतेयं धोक्याचे
जानेवारी महिन्यात 2662 वाहनचालकांकडून दंडाची वसुली
पिंपरी – शहरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामध्ये मोबाइल फोनमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेऊन मोबाइलवर बोलत किंवा मॅसेज पाहत वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. 2019 या एकाच वर्षात 52 हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
2020च्या जानेवारी महिन्यातही 2662 आणि फेब्रुवारी महिन्यात आजतागायत 1200 वाहनचालकांना पोलिसांनी दंड ठोठावला. तरीही वाहनचालक बेफिकीरच आहेत. “ना अपघाताचे भय, ना कारवाईचा धाक’ अशी स्थिती रस्त्यावर दिसून येत आहे.
सध्याच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनलेल्या मोबाइल वाहन चालवितानाही होत असलेला वापर अपघातास कारणीभूत ठरत आहे. शहरात दिवंसेंदिवस बेशिस्त वाहनचालकांचे प्रमाण वाढले असून मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र कारवाई करुन, जनजागृती करुनदेखील सद्यस्थितीत “ड्रायव्हिंग विथ मोबाइल टॉकिंग’चे प्रमाण वाढतच आहे. बऱ्याचदा कानाला हेडफोन लावून गाणे ऐकण्याच्या नादात अनेकांचा गंभीर अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
हेल्मेटमध्ये मोबाइल ठेवून बोलणेही धोकादायकच
हल्ली वाहनचालक हेल्मेटमध्ये मोबाइल ठेऊन बोलतच वाहने चालवत असल्याचे दिसून येते. चालत्या वाहनावर मोबाइलवरुन संवाद साधण्यात अडथळा येतो, आवाज व्यवस्थित येत नाही. यामुळे वाहनचालकांचे लक्ष रस्त्यावरील इतर वाहनांऐवजी मोबाइलवरील संवादावरच अधिक असते. वाहनचालकांकडून महामार्गालगत किंवा रस्त्यालगत लावलेल्या सूचनाफलकांकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. त्याचप्रमाणे मोबाइलवर बोलत असताना अचानक गतिरोधक, दुभाजक, खड्डे, यामुळे वाहन सावरण्याच्या नादात शेकडो वाहनचालक गंभीर जखमी झाले आहेत.
मोबाइलमुळे अपघाताची शक्यता चौपटीने वाढते
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, भारतात दर तासाला 16 लोक रस्ता अपघातात आपला जीव गमावतात. त्यापैकी अनेक अपघातात मोबाइल फोन कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. मोबाइलवर बोलताना गाडी चालवल्यास अपघाताची शक्यता चारपटीने वाढते. यासंदर्भात सेव्ह लाईफ फाउंडेशन संस्थेने सर्व्हेक्षण केले. या सर्व्हेक्षणातही अशीच तथ्ये समोर आली आहेत.
चौदा महिन्यांत एक कोटीचा दंड वसूल
पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने शहरात मागील वर्षी 1 जानेवारी ते 31 डिसेबर 2019 दरम्यान मोबाइल टॉकिंग या गुन्ह्यांतर्गत 52 हजार 319 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याअंतर्गत 89 लाख 76 हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तर चालू वर्षी 1 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान 3 हजार 862 वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यात जानेवारी महिन्यात 2 हजार 662 जनांकडून 5 लाख 32 हजार 400 रुपये दंड तर फेब्रुवारी महिन्यात 1200 वाहनचालकांकडून 2 लाख 40 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पिंपरी चिंचवड आयुक्तालय वाहतुकशाखेचे पोलिस निरीक्षक प्रसाद गोकुळे यांनी दिली.
केवळ तरुणच नव्हे तर प्रौढ व्यक्ती व महिलावर्गही सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळत आहे. कारवाईबरोबरच वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे. पालकांनीही सजग रहावे, मुलांकडून अपघात घडल्यास शिक्षा पालकांना भोगावी लागते.गेल्या पंधरा दिवसात पायी चालणाऱ्यांना धडक दिल्याच्या दोन घटना घडल्या आहेत.
– प्रदीप लोंढे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी