…तरीही व्हेंटिलेटर बेडलाच मागणी

ऑक्सिजन बेड शिल्लक, नवीन करोनाबाधित घटले

पुणे – गेल्या 15 दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे, परंतु त्या तुलनेत गंभीर रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे व्हेंटिलेटर बेडची मागणी अद्यापही पूर्णपणे कमी झाली नसल्याचे “डॅशबोर्ड’ आणि एकूण आकडेवारीवरून दिसून येते.

करोना बाधितांची वेगाने वाढणारी संख्या लक्षात घेता महापालिकेने फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 10 हजार 790 बेडची व्यवस्था केली. त्यातील 7 हजार 256 बेड ऑक्सिजन आणि आयसीयुमधील व्हेंटिलेटर असलेली 806 बेडची व्यवस्था केली आहे.

एकूणच बाधितांची संख्या कमी झाली असली, तरी गंभीर रुग्णांची संख्या अद्यापही दीड हजारांपर्यंत आहे. यातील अनेक रुग्ण अतिशय गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटर लावले आहे. सद्य:स्थितीत ऑक्सिजन बेड शिल्लक राहात आहेत; परंतु व्हेंटिलेटर बेड मात्र अद्याप फुल्लच आहेत. मागणी मात्र पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

15 फेब्रुवारीपासून रुग्णवाढीचा वेग अतिशय जास्त झाला. मार्च आणि एप्रिल महिन्यात तर करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहरच केला. सुमारे सात हजारांपर्यंत रोजचे बाधित सापडत होतेच, परंतु रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा खूपच जास्त होते. त्यातून दुसऱ्या लाटेचा विळखा तरुणांनाही पडला आणि मृतांमध्ये तरुण बाधितांची संख्याही जास्त झाली. करोनाची लागण झाल्यानंतर अचानक प्रकृती गंभीर होणे, ऑक्सिजनची लेव्हल कमी होणे असे प्रकार झाल्यानंतर साहजिकच रुग्णाला ऑक्सिजनची गरज पडते. त्यातूनही स्थिती गंभीर झाल्यास व्हेंटिलेटरची गरज लागते. नेमका हाच प्रकार या दुसऱ्या लाटेत झाला आणि व्हेंटिलेटर बेडची मागणी वाढली. ती पुरवताना महापालिका प्रशासनाला नाकीनऊ आले. तरीही महापालिकेने 806 बेडची उभारणी केली.

सध्या व्हेंटिलेटर बेडची मागणी कमी झाली नसली, तरी ऍव्हरेजचा विचार केला तर मार्च-एप्रिलमध्ये व्हेंटिलेटर बेडसाठी दिवसाला जर दहा कॉल्स येत असतील तर आताच्या परिस्थितीत एक किंवा दोन कॉल्स येत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.