पक्षनेत्यांच्या बैठकीतील उपस्थितीने खळबळ
पुणे – महापालिकेच्या सोमवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत उपस्थित असलेले पालिकेचे सर्व पदाधिकारी “रेड झोन’मध्ये आले आहेत. या बैठकीत उपस्थित असलेल्या एका महत्त्वाच्या पदावरील पदाधिकाऱ्याच्या घरातील एका व्यक्तीला करोनाची संसर्ग झाला आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्याचे नमुनेही तपासणीसाठी नेण्यात आले आहेत. त्यामुळे या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वांचीच चिंता वाढली आहे. दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर मंगळवारी होणारी स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली आहे.
संबंधित पदाधिकारी नियमितपणे पालिका पक्षनेते, प्रभाग समिती तसेच प्रशासनाच्या इतर बैठकांना उपस्थिती लावत आहे. या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाचे तपासणी नमुने एका खासगी रुग्णालयात घेण्यात आले होते. त्याचे अहवाल सोमवारी रात्री आले आहेत. हा पदाधिकारी सोमवारी दुपारी बैठकीसाठी पालिकेत आला होता. त्यात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षांचे पदाधिकारीही उपस्थित होते. ही बाब मंगळवारी लक्षात आल्यानंतर सर्वच पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. त्यामुळे या पदाधिकाऱ्याचे अहवाल येईपर्यंत बहुतांश पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. पक्षनेत्यांच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
एका पदाधिकाऱ्याचा निकटवर्तीय करोनाबाधित असल्याचे समजताच खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित पदाधिकाऱ्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत. ते खासगी प्रयोगशाळा आणि एनआयव्हीला पाठवले आहेत. तर, इतर पदाधिकाऱ्यांसाठी खबरदारीच्या उपाययोजना घेण्यात आल्या आहेत. संबंधित पदाधिकाऱ्याचा अहवाल आलेला नाही.
– डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख