पुणे – शहरात ओला व उबेर वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. विमानतळावरून शहराच्या विविध भागांत प्रवासी सोडण्यासाठी या कंपन्यांच्या वाहनांचा वापर होतो. यामुळे करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खासगी वाहनचालकांनी प्रवासी घेण्यापूर्वी वाहनाचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश आरटीओने दिलेले आहेत.
करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासन सतर्क होत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. यामुळे शहरातील लोहगाव विमानतळ, रेल्वे स्थानक, एसटी स्थानके आदी ठिकाणाहून प्रवाशांची खासगी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते.
या वाहनांना आटकाव करणे अशक्य असल्याने किमान वाहनांची स्वच्छता राखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली एसटी बस, पीएमपी बसची दररोज साफ-सफाई केली जात आहे. त्यामुळे खासगी वाहनांनी दक्षता घेत वाहनांचे निर्जंतुकीकरण करावे, असे आदेश आरटीओने दिले आहेत. याबाबत खासगी वाहनचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.