- शहरात 80 हजार कुत्र्यांचा वावर; चार संस्थेकडे दिले कामकाज
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाकडून श्वान निर्बीजीकरण करण्याचे काम चार संस्थांना दिले आहे. यांच्यामार्फत सप्टेंबरपर्यंत म्हणजे नऊ महिन्यात एकूण 15 कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पशू वैद्यकीय विभागाकडून मिळाली आहे.
शहरातील सर्वच भागात मोकाट जनावरे व कुत्रे यांचा मोठा वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. कुत्र्यांची वाढती संख्या थांबविण्यासाठी चार संस्थाना निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याचे काम दिले आहे. हेच काम गतवर्षी दोन संस्थाना देण्यात आले होते. यासाठी महापालिका प्रशासनाने 1 कोटी 25 लाखांची निविदा काढण्यात आली आहे. एका कुत्र्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यासाठी 999 रुपये खर्च महापालिकेला करावा लागत आहे.
नेहरुनगर येथील निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केंद्रामध्ये नऊ महिन्यात 15 हजार श्वानांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गतवर्षी दोन संस्थाच्या माध्यमातून 12 हजार कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शहरात कुत्र्यांचा वावर वाढत चालल्याने यंदा कामांना गती आणण्यासाठी चार संस्थांना काम देण्यात आले आहे. मात्र, यंदा गेल्या 9 महिन्यापासून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यास यंदा मर्यादा आल्या. मात्र, तरीसुद्धा नऊ महिन्यात 15 हजार शस्त्रक्रिया केल्याचा दावा पशूूवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी केला आहे.
शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करायची असल्यास निर्बीजीकरण शस्त्रक्रिया होणे आवश्यकच आहेत. मात्र, याचबरोबर मोकाट कुत्र्यांना नागरिकांकडून मिळणारी नकारात्मक वागणूक बदलायला हवी. त्यांना जर त्रास दिला नाही. तर, कुत्री उगीच कुणालाही चावत नाहीत. त्यांना चांगली वागणूक दिल्यास कुत्र्यांकडून त्रास होणार नाही.
– नारायणी परीथे, प्राणी मित्र