पुणे -नागरी भागात आलेला वन्यप्राणी अथवा विहिरीत पडलेल्या प्राण्याला वाचविण्यासाठी जलद मदत उपलब्ध व्हावी, यासाठी वनविभागाकडून प्रायमरी रिस्पॉन्स टीम (पीआरटी) अर्थात प्राथमिक प्रतिसाद तुकडी नेमली जाणार आहे. या टीम’ला आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष प्रशिक्षणदेखील विभागाकडून दिले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात बिबट्या- मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. विशेषतः शहरालगतच्या भागांमध्ये तसेच जिल्ह्यातील दौंड, शिरूर, जुन्नर, इंदापूर, बारामती तालुक्यांत अनेकदा बिबट्या नागरी वस्तीत, शेतात येत असल्याचे आढळते.
तर काही ठिकाणी विहिरीत पडलेला बिबट्या, अपघातात जखमी बिबट्याची सुखरूप सुटका करणे हे विभागासमोर एक मोठे आव्हान असते. याव्यतिरिक्त इतरही वन्यप्राणी नागरी वस्तीत आल्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये घडल्या आहेत. अशा स्थितीत प्राथमिक प्रतिसाद हा महत्वाचा ठरतो. यावर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
अशी असेल पीआरटी:
वनविभागाच्या सर्व रेंजमध्ये असलेल्या 95 वनसुरक्षा रक्षकांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत असेल.
एका वन सुरक्षारक्षकाअंतर्गत 20 अशा एकूण 200 सदस्यांचा पीआरटी’त समावेश.
वन्यजीव सुरक्षा आणि मदातकार्यासाठी दिले जाणार विशेष प्रशिक्षण, गणवेश, काठी पुरवली जाणार वनविभागाचे अधिकृत स्वयंसेवक असल्याचे पत्र दिले जाणार.
वन्यजीव बचाव आणि मदतकार्यात पाहिले काही तास महत्त्वाचे असतात. त्यामुळे प्राथमिक प्रतिसाद हा महत्वाचा ठरतो. यासाठी नागरिकांच्या मदतीने आम्ही पीआरटी नेमण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यात समाविष्ट होण्यासाठी इच्छुक स्वयंसेवकांची यादी तयार करण्याचे आदेश वनसुरक्षा रक्षकांना दिले आहेत.
– राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग