प्रदूषणमुक्त दिवाळीकडे पाऊल

पुण्यातील हवेची गुणवत्ता राहिली “उत्तम’

पुणे – दिवाळीत फटाक्‍यांच्या आतषबाजीमुळे होणारे हवेचे प्रदूषण हा नेहमीच चिंतेचा विषय असतो. मात्र, यंदा पुणेकरांची दिवाळी ही प्रदूषणमुक्त दिवाळी ठरली. पूर्ण दिवाळीदरम्यान पुण्यातील हवेची गुणवत्ता “उत्तम’ या प्रकारात असल्याचे “सफर’ संस्थेच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळेच पुणेकरांची यंदाची दिवाळी ही बहुतांशी “ग्रीन’ दिवाळी ठरली.

दिवाळीत शहरातील हवेची गुणवत्ता दरवर्षी असमाधानकारक पातळीपर्यंत खालावते. यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विशेषत: श्‍वसनासंबंधी विकार उद्‌भवण्याची शक्‍यता वाढते. त्यामुळेच उत्सव काळातील खालावणारी हवेची गुणवत्ता ही कायमच पुणेकर आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी काळजीचा विषय ठरतो. हवेची गुणवत्ता खालावण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्सवकालावधीत उडवले जाणारे फटाके. या फटाक्‍यांमधून निघणारा धूर हवेत मिसळून बराच काळ तसाच राहिल्याने हवेची गुणवत्ता खालावते.

मात्र, यंदा दिवाळीत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि कमी प्रमाणात वाजविलेले फटाके यामुळे शहराच्या हवेत मिसळणाऱ्या प्रदूषकांचे प्रमाण अत्यंत कमी होते. परिणामी, हवेची गुणवत्ता उत्तम होती. “सफर’ या केंद्रीय संस्थेतर्फे शहरात विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता पाहणी केली जाते.

संस्थेच्या पाहणीनुसार, “गेल्या तीन दिवसातील हवेची पीएम 10 चे प्रमाण 45 ते 52 क्‍युबिक घनमीटर इतके होते, तर पीएम 2.5 चे प्रमाण 29 ते 28 क्‍युबिक घनमीटर इतके होते. हे प्रमाण घातक प्रमाणापेक्षा अत्यंत कमी असून, ही स्थिती कायम राहिल्यास पुढील काही दिवस हवेची स्थिती उत्तम राहील,’ असा अंदाजदेखील संस्थेकडून वर्तविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.