मुंबई – मैदानावरील पंचांनी जीवदान दिल्यामुळेच एकदिवसीय सामन्यात सचिन तेंडुलकरला द्विशतक फटकावता आले असा धक्कादायक खुलासा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2010 साली ग्वाल्हेरला झालेल्या एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने द्विशतकी खेळी करत अशी कामगिरी करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरण्याचा मान मिळवत विक्रम साकारला होता. या सामन्यात सचिनने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनवर जास्त आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली होती. या खेळीत सचिनने तब्बल 25 चौकार फटकावले होते. मात्र, सचिन द्विशतकाच्या जवळ आलेला असताना त्या सामन्यातील पंच इयान गोल्ड यांनी बाद असूनही सचिनला जीवदान दिले त्यामुळेच तो विक्रमी द्विशतक पूर्ण करु शकला असा धक्कादायक खुलासा जवळपास 10 वर्षांनी स्टेन याने केला आहे.
खरेतर सचिनने जेव्हा हा विक्रम साकारला होता त्यावेळी सामन्यानंतर बोलताना स्टेनने सचिनचे कौतुक केले होते. त्याने बॅटऐवजी ब्लाइंडस्टिक जरी वापरली असती तरीही आम्ही त्याला बाद करु शकलो नसतो, अशी प्रतिक्रिया स्टेनने दिली होती आणि आज इतक्या वर्षांनी त्याला कंठ फुटला का अशा शब्दात सोशल मीडियावर नेटकरी मंडळींनी स्टेनला ट्रोल केले आहे.
स्टेनची थापेबाजी…
पंच इयान गोल्ड यांच्याकडे सचिन पायचित असल्याचे अपिल केले होते. मात्र, त्यांनी सचिनला नाबाद ठरवले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केल्यावर त्यांनी धक्कादायक विधान केल्याचेही स्टेनने सांगितले. मित्रा, सचिनला बाद दिले, तर मला सामना संपल्यावर हॉटेलवर परतणे कठीण झाले असते असे गोल्ड यांनी म्हटल्याचे स्टेनने सांगितले. मात्र, स्टेन केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटीच हे आरोप करत असून आता पाकिस्तानी क्रिकेटपटूंप्रमाणे स्टेनही थापेबाजी करत आहे, अशा प्रतिक्रिया देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्या आहेत.