नवी दिल्ली : भारतातील पोलाद उद्योग आता विकसित झाला असून देशाला जेवढे पोलाद लागते तेवढे पोलाद भारतात तयार होते. मात्र काही पोलादाची विशेषतः स्टेनलेस स्टील पोलादाची अनावश्यक आयात होत आहे.ही आयात रोखून देशातील स्टेनलेस स्टील उद्योगाला सुरक्षितता देण्याची गरज असल्याचे मत जिंदाल स्टेनलेस या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अभ्युदय जिंदाल यांनी व्यक्त केले.
व्यापार युद्धामुळे जागतिक पातळीवर पोलादाचे उत्पादन जास्त झाले आहे. तर मागणी कमी आहे. पोलादाचे उत्पादन जास्त करणारे देश भारतामध्ये कमी किमतीवर पोलाद पाठवीत आहेत. अशा परिस्थितीत देशातील पोलाद उत्पादनांच्या किमती कमी होत आहेत. त्यामुळे देशांतर्गत पोलाद उत्पादनावर परिणाम होत असल्याचे जिंदाल यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या या विषयावरील कार्यक्रमात बोलताना सांगितले.
भारताने देशातील स्टेनलेस स्टील क्षेत्राला संरक्षण दिल्यामुळे अपराधीपणा निर्माण होण्याची गरज नाही. कारण अमेरिका आणि युरोपातील बहुतांश देश स्थानिक स्टेनलेस स्टील उत्पादकांना संरक्षण देत आहेत. भारत सरकारने त्यांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे मत जिंदाल यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, युरोप आणि अमेरिकाच नाही तर मध्य आशिया आणि कॅनडासारखे देशही स्थानिक पातळीवर पोलादाचे उतदन जास्त प्रमाणात होत नसतानाही स्थानिक उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
पुरेशी उत्पादनक्षमता
पोलाद उद्योगाने गुंतवणूक करून आपली उत्पादन क्षमता 7.5 दशल टन इतकी केलेली आहे. सध्या या उत्पादन क्षमतेचा 60 टक्के वापर होत आहे. आणखी 30 टक्के उत्पादन वाढण्यास वाव आहे. मात्र गेल्या वर्षी भारतात 17 लाख 30 हजार टन इतक्या पोलादाची आयात झाली आहे. हे पोलाद चीन, इंडोनेशिया, व्हीएतनाम, दक्षिण कोरियातून जास्त प्रमाणात येते. त्याचबरोबर अनेक देश इतर देशाच्या माध्यमातून भारतात पोलाद निर्यात करीत आहेत.