पोलाद आणखी महागले; बांधकाम, वाहन क्षेत्राला जोरदार फटका

मुंबई – देशातील पोलाद कंपन्यांनी पुन्हा पोलादाच्या दरात वाढ केली प्राप्त माहितीनुसार हॉट रोल्ड कॉइल आणि कोल्ड रोल्ड कॉइलच्या किमतीत अनुक्रमे 4 हजार आणि 4 हजार 900 रुपये प्रति टन इतकी वाढ करण्यात आली आहे.

आता हॉट रोल्ड कोईलचा दर 70 ते 71 हजार रुपये प्रति टन इतका झाला आहे तर कॉल्ड रोल्ड कॉईलचा दर 83 ते 84 हजार रुपये प्रति टन इतका झाला आहे. दोन दिवसात कंपन्यांनी पोलादाचे दर वाढविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोन्ही पोलादाचा वापर वाहन घरगुती वस्तू, बांधकाम, वाहन या क्षेत्रात केला जातो. त्यामुळे घरांच्या आणि घरगुती उत्पादनाच्या उत्पादन मूल्यात वाढ होऊन या वस्तूंच्या किमती वाढू शकतात असे समजले जाते.

गेल्या पंधरवड्यातच पोलाद कंपन्यांनी पोलादाच्या दरात वाढ केल्यानंतर बांधकाम क्षेत्रासह इतर क्षेत्रांनी पोलादाच्या किमती जास्त झाल्या आहेत. सरकारने हस्तक्षेप करून या किमती कमी करण्याची मागणी केली होती. 

त्यासंदर्भात वृत्तसंस्थांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया या कंपनीशी संपर्क साधला असता बाजार तंत्रानुसार पोलादाचे दर वाढत आहेत असे प्रवक्‍त्याने सांगितले. मात्र तपशील देण्यास नकार दिला.

यासंदर्भात बोलताना जेएसपीएल या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जागतिक बाजारात पोलादाच्या कच्च्या मालाचे दर वाढले असल्यामुळे पोलादाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे भारतातही पोलादाच्या किमती वाढत आहेत. भारतामध्ये पोलाद खनिजाची किंमत प्रति टनाला चार हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आम्हाला दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही.

जागतिक बाजारापेक्षा भारतातील पोलादाच्या किमती 20 ते 25 टक्‍क्‍यांनी कमी आहेत. भारतातील पोलाद उत्पादकांनी त्यामुळे निर्यात वाढविण्यावर भर दिला आहे. मात्र किमती वाढत असल्यामुळे भारतातील बांधकाम क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर छोटे उद्योग पोलादाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यांच्याकडील इन्व्हेंटरी कमी असते. यामुळे त्यांना महाग पोलाद खरेदी करावे लागणार आहे.

भारतातील पोलादाचे दर जास्त आहेत असे गेल्या आठवड्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले होते. त्यामुळे रस्त्याच्या बांधकामामध्ये पोलादाचा वापर कमी करण्यावर भर देण्याचे त्यांनी ठरविले असल्याचे सांगितले होते. याअगोदरही पोलाद कंपन्यांवर गरजेपेक्षा जास्त दरवाढ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.