सुट्टी शहरातच घालवा, संपर्कात राहा!

आयुक्‍तांच्या सूचना : पावसाळी अधिवेशनासाठी माहिती देण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची

पिंपरी  – विधिमंडळाच्या सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनात पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित विचारलेल्या प्रश्‍नांची माहिती महापालिकेच्या वतीने राज्य सरकारला उपलब्ध करून द्यावी लागते. ही माहिती उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख अथवा शाखाप्रमुखांची आहे. त्यामुळे सर्व विभागप्रमुखांनी दीर्घ मुदतीच्या रजेवर न जाता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील संपर्कात राहण्याच्या सूचना महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत.या कामात हलगर्जीपणा झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाची असणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत विभागप्रमुखांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीदेखील शहरातच राहावे लागणार आहे.

राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनाच्या कामकाजाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संदर्भात उपस्थित केलेल्या तारांकित, अतारांकित प्रश्‍न, आश्‍वासने, लक्षवेधी सूचना, विशेष उल्लेख सूचना, अर्धा तास चर्चेची सूचना, कपात सूचना तसेच औचित्याचा मुद्दा, ठराव आदी प्रश्‍नांबात तसेच केलेल्या कार्यवाहीबाबतची माहितीची मागणी राज्य सरकारकडून केली जाते. ही माहिती तातडीने राज्य सरकारला उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. त्याकरिता संबंधित विभागप्रमुखांकडील माहिती आयुक्‍तांच्या मान्यतेने तातडीने स्वयंस्पष्ट अहवाल, पूरक टिपणीसह उपलब्ध करून दिली जाते. राज्य सरकारकडून मागविलेली माहिती ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाते. त्याकरिता मंत्र्यांची मान्यता घेऊन तारांकित प्रश्‍नांसाठी आठ दिवस तर अतारांकित प्रश्‍नांसाठी 20 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

या मुदतीमध्ये विधिमंडळ सचिवालयाला प्रश्‍नाची उत्तरे प्राप्त न झाल्यास, ऑनलाईन प्रणाली आपोआप बंद होईल. त्यानंतर प्रश्‍नांची उत्तरे विधानमंडळ सचिवालयास देता येणे शक्‍य होणार नाही. अशा परिस्थितीत उत्तरे द्यावयाची झाल्यास, विलंबाच्या खुलाशासह व जबाबदारी निश्‍चित करून द्यावे लागणार आहेत. अधिवेशनाच्या काळात सर्व विभागप्रमुख व शाखाप्रमुखांबरोबरच विभागातील कर्मचाऱ्यांनी देखील मुख्यालय सोडू नये. प्रदीर्घ रजेवर न जाता सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयाच्या संपर्कात राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.