बारामती तालुक्‍यातील स्थिती; रेशनिंग दुकानदारांची मनमानी

माळेगाव – राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यानुसार रास्त भाव दुकानदारांनी अन्नधान्याची निर्धारित केलेली किंमत त्याच्या प्रमाणाबाबत माहिती असलेला फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावावा, अशा सूचना लोकलेखा समितीच्या अहवालात दिलेला असताना बारामती तालुक्‍यात सर्रास रास्त भाव दुकानदार, रेशनिंगवाले दुकानाबाहेर फलक लावत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र याबाबीकडे जिल्हा पुरवठा अधिकारी नियंत्रक व शिधावाटप हे बघायची भूमिका घेताना दिसत आहे.

शासनाने दि. 11 एप्रिल 2019 रोजी निर्धारित केलेल्या लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण, किरकोळ विक्रीचे मूल्य, अन्नधान्याची पात्रता, रास्त भाव दुकान उघडणे, बंद करणे व भोजनाची वेळ तसेच अन्नधान्याचा दर्जा आणि प्रमाण आदीबाबत काही तक्रारी असल्यास त्या कोणत्या अधिकाऱ्याकडे कराव्यात याबाबत माहिती, त्याचबरोबर तक्रार करण्यासाठी टोल फ्री, हेल्पलाईन क्रमांक आदी माहिती असलेला फलक रास्तभाव दुकानांमध्ये सर्वांना सहज दिसेल, अशा ठिकाणी लावण्याचे आदेश संसदीय लोकसेवा समितीने केलेल्या सूचना आणि नियंत्रण आदेश 2015 च्या कलमानुसार दिलेले आहेत. मात्र, काही रास्त भाव दुकानदार शासनाचे आम्ही मालक असल्यासारखे लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात. अन्नधान्याचा पुरवठा झाला असताना ही लाभार्थ्यांना माल दिला जात नाही. तारीख संपल्याचे कारण सांगून माल बुडाला आहे. आता पुढच्या महिन्यात या अशी उत्तरे देऊन लाभार्थ्यांची अडवणूक पिळवणूक केली जात असल्याचे नागरिक सांगतात. अशा प्रकारच्या तक्रारींचा ओघ तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यामुळे रास्त भाव दुकानदारांनी लाभार्थ्यांना वरीलप्रमाणे उत्तरे दिल्यास त्यांची लेखी तक्रार पुरवठा अधिकाऱ्यांकडे करावी. एका दुकानदाराकडे रेशन कार्डधारक किती त्यांना येणारा मालक किती मालविक्री होतो, किती माल शिल्लक राहतो, याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना येथील सजग नागरिक मागणी करणार आहेत.

रेशनिंग दुकानदारांना फलकाबाबत योग्य त्या सूचना दिल्या जातील. व जे दुकानदार नियम पाळत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– संजय स्वामी, पुरवठा निरीक्षक, बारामती.


अनेकादा माल घेण्यासाठी गेलो असता, रेशनिंग दुकानदार माल देताना हुज्जत घालत असतो. सकाळी या दुपारी अशी उत्तरे दिली जातात. ग्रामीण भागातील बहुतांश लाभार्थी अशिक्षित असल्याने दुकानदाराने सांगितलेली माहिती प्रमाण मानून घरी जातात.
– प्रशांत गावंडे, नागरिक, माळेगाव

Leave A Reply

Your email address will not be published.