लाहोर : शीख साम्राज्याचे पहिले राज्यकर्ते महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा पुन्हा एकदा उभारण्याचा निर्णय पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या सरकारने घेतला आहे. बुधवारी (उद्या) हा पुतळा उभारला जाणार आहे. भारतातून येणाऱ्या शीख भाविकांना बघता यावा, यासाठी करतारपूर साहिब येथे हा पुतळा उभारला जाणार आहे. पंजाबची राजधानी असलेल्या लाहोरच्या इशान्येला १५० किलोमीटर अंतरावर आणि भारताच्या सीमेजवळ असलेले करतारपूर साहिब हे ठिकाण गुरुद्वारा दरबार साहिब म्हणूनही ओळखले जाते.
महाराजा रणजीत सिंग यांचा ९ फुटी ब्रॉन्झचा पुतळा २०१९ मध्ये लाहोरच्या किल्ल्यामध्ये महाराजा रणजीनत सिंगांच्या समाधीजवळच उभारण्यात आला होता. मात्र तेहरिक-ए-लब्बाईक-पाकिस्तान या अति कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोनवेळा या पुतळ्याची मोडतोड केली होती. मात्र आता हा पुतळा करतारपूर साहिब येथे उभारला जाणार आहे.
स्थानिक आणि भारतीय शीखांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे, असे पंजाबचे पहिले शीख मंत्री आणि पाकिस्तान शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष सरदार रमेश सिंग अरोरा यांनी सांगितले. आता पुतळ्याच्या रक्षणासाठी पुरेशी काळजी घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराजा रणजित सिंह संधी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले असून ते लवकरच पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले.
भारतीय समुदायाच्या उपस्थितीत होणार अनावरण…
महाराजा रणजित सिंग हे शीख साम्राज्याचे संस्थापक होते. त्यांनी १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात लाहोर येथे मुख्यालय असलेल्या वायव्य भारतीय उपखंडावर राज्य केले होते. सध्या, महाराजा रणजित सिंग यांच्या पुण्यतिथीच्या संदर्भात उत्सवात भाग घेण्यासाठी गेल्या आठवड्यात भारतातून येथे आलेले ४५५ शीख बुधवारी कर्तारपूर साहिब येथे सिंग यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.