राज्यांची स्वायत्तता धोक्‍यात

देशाच्या कारभाराचा खेळखंडोबा : अशोक चव्हाण यांना आरोप


भाजप सरकारला पायउतार झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीमुळे राज्यांची स्वायत्तता धोक्‍यात आली आहे, त्यामुळेच देशाच्या कारभाराचा खेळखंडोबा झाला आहे. विशेष म्हणजे कधी नव्हे ते देशातील प्रशासनामध्येच वाद सुरू झाले आहेत. परिणामी देशातील जनता सुरक्षित राहिलेली नाही. या सर्व प्रकारांना भाजपचे सरकारच कारणीभूत आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला.

सरकारच्या धोरणाविरोधात कॉंग्रेसने “जनसंघर्ष’ सुरू केला असून केंद्रातील आणि राज्यातील सरकारला पायउतार केल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना चव्हाण यांनी हा आरोप केला. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार शरद रणपिसे, शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, दिप्ती चवधरी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेवक रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

महापालिकेची सत्ता, खासदार, आमदार तसेच केंद्र आणि राज्यातील मंत्री असा ताफा असतानाही पुण्याचा विकास करण्यास सत्ताधाऱ्यांना अपेक्षित यश आले नाही, असा आरोप करून चव्हाण म्हणाले; पुण्याच्या पाण्यात कपात करू नये, यासाठी सत्ताधारी पक्षातील खासदारांनाच उपोषणास बसण्याची वेळ आली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने सत्तेवर येण्याच्या आधी जनतेला जी आश्‍वासने दिली होती ती पूर्ण करण्यास दोन्हीही सरकारला सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच तीन राज्यांतून परिवर्तनाची सुरुवात झाली असून आगामी काळातही केंद्र आणि महाराष्ट्रातही परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्‍वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.

शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर अविनाश बागवे यांनी सूत्रसंचालन केले. नगरसेवक अजित दरेकर यांनी आभार मानले.

देशात खुनशी राजकारण सुरू
भाजपच्या नेत्यांना सत्तेची मस्ती आली असून या नेत्यांनी देशाचा आणि राज्याचा विकास न करता खुनशी राजकारण सुरू केले आहे, असा आरोप करून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले; त्यामुळेच भाजपला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला आहे. या समविचारी पक्षांच्या साथीनेच आगामी निवडणुकांमध्ये भाजपला आणि निष्क्रिय शासनाला धूळ चारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)