पुणे- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 161 पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 घेतली जाणार आहे. तर 21 ऑगस्टला राज्यभरातील 37 केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
एमपीएससीने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठीची जाहिरात बुधवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार वित्त आणि लेखा सेवा गट अ सहायक संचालक, नगरपालिका, नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, बालविकास प्रकल्प अधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क सहायक आयुक्त गट ब, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त गट ब, कक्ष अधिकारी गट ब, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब आदी पदांसाठी प्रक्रिया राबवण्यात येईल.
पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदसंख्या आणि आरक्षणामध्ये राज्य शासनाच्या विभागांच्या सुचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जाणार आहेत.