देहूगाव, (वार्ताहर) – महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाच्या माध्यमातून देहू नगरपंचायतीला अग्निशमन फायर बुलेट देण्यात आली आहे. यामुळे देहू शहर आणि परिसरातील अरुंद रस्ते, गल्लीबोळ असलेल्या ठिकाणी जलद गतीने पोहचून आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे.
आगीची घटना घडल्यानंतर ती आग तत्काळ विझवली तर होणारे नुकसान टाळता येते. अग्निशमन दलाच्या चारचाकी वाहनांचा वेग कमी असतो. तसेच अरूंद ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी जाऊ शकत नाही. या अडचणींच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन फायर बुलेटची निर्मिती करण्यात आली आहे.
फायर बुलेट गाडीचे वैशिष्ट्ये
फायर बुलेट गाड्या या आपल्या वापरातील बुलेट गाड्यांप्रमाणेच आहेत. मात्र, त्यांना अग्निशामक दलाच्या उपयोगितेप्रमाणे बदलण्यात आले आहे. अग्निशमन दलाचे अत्याधुनिकीकरण करणे, कामात वेग आणणे,
कमी खर्च आणि मनुष्यबळामध्ये घटनास्थळापर्यंत पोहचणे या हेतूने फायर बुलेट गाड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गाडीत नऊ लीटर क्षमतेचे दोन होम सिलेंडर, तसेच ३१२ हॉर्स पॉवर इतके प्रेशर असून गाडीसोबत प्रथमोपचार कीटही आहे.