“महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरणाची गरज; खरेदीची परवानगी मिळावी”

राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई – महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवले आहे. राज ठाकरे यांनी या पत्रामधून मोदींसमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यांनी यामध्ये राज्याला स्वतंत्रपणे लस खरेदी करू देण्याची मागणी केली आहे. तसेच महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण करावे, त्याचबरोबर खासगी संस्थांनाही लस खरेदीची परवानगी दिली जावी, अशी मागणीही त्यांनी मोदींकडे केली आहे.

राज्यातील खासगी संस्थांना लस खरेदी करता यावी, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. तसेच महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियम पाळून लसविक्रीची परवानगी सीरमला द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा यासाठी इतर खासगी संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी त्याचसोबत करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्‍यक औषधे उदा. रेमडेसिवीर, ऑक्‍सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्‍यक पाऊले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणीही राज ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

महामारी सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातील पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. संपूर्ण देश आज करोनाच्या महामारीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट झाली असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

पहिल्या लाटेनंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. अर्थातच देशभरही याचे आर्थिक, सामाजिक पडलेले पडसाद आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाऊन जाहीर करणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्‍या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.