पुणे – अनुष्का थत्ते व आर्या मेस्त्री यांनी मुलींच्या 10 वर्षाखालील गटात शानदार विजय मिळविला आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान कायम राखले. ही स्पर्धा मॉडर्न क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे.
नाशिकची खेळाडू थत्तेने स्थानिक खेळाडू मुक्तजा वागळेचा 24-22, 21-18 असा पराभव केला. तिने स्मॅशिंगच्या जोरकस फटक्यांचा सुरेख खेळ केला. मुंबई उपनगरची खेळाडू आर्या हिला आयुषी काळेविरूद्ध 21-16, 21-17 असा विजय मिळविताना झगडावे लागले. याच गटात शुभ्रा वैशंपायनने मिराशा शहावर 21-2, 21-0 असा दणदणीत विजय मिळविला. तिने केलेल्या आक्रमक खेळापुढे मिराशाचा बचाव निष्फळ ठरला.
धृती जोशीने ख्याती कात्रेला 21-8, 21-9 असे पराभूत केले. अनुष्का रूपदेने उत्कंठापूर्ण लढतीनंतर ऋतु किटलेकरला 21-10, 19-21, 21-10 असे हरविले.
मुलांच्या 13 वर्षाखालील गटात अर्चित व्यासने शौर्य देशमुखचा 21-4, 21-9 असा सहज पराभव केला. त्याने ड्रॉपशॉट्सचा बहारदार खेळ केला. रियान करंदीकरने शौर्य पुरोहितचे आव्हान 21-4, 21-7 असे संपुष्टात आणले. विराज सराफने हेमराज लवंगेचा 21-15, 21-17 असा पराभव करीत विजयी वाटचाल कायम राखली.
या स्पर्धेचे उद्घाटन ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांच्या हस्ते झाले. या वेळी बॅडमिंटन संघटक विश्वास देसवंडीकर, रणजित नातू, अजित देशपांडे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतील अंतिम सामने रविवारी होणार आहेत.