राज्य ‘तापले; उन्हाचा कडाका वाढला

पुणे – राज्यात सध्या उन्हाचा चटका आणि उकाडा सातत्याने वाढताच राहणार आहे. मंगळवारी राज्यात उच्चांकी तापमान हे अमरावती येथे 41.6 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. याशिवाय सोलापूर, परभणी आणि बीडमध्ये तापमान चाळिशीपार गेले आहे.

मार्चमध्ये राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा 39 अंशांच्या पुढेच राहिला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाड्याही वाढ होत आहे. महाराष्ट्रातील अमरावती येथे 41 अंश, सोलापूर येथे 40.8 बीड 40.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण, वगळता राज्यात बहुतांशी तापमान 38 अंशांच्या पुढे गेले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून त्यापासून दक्षिण तमिळनाडूपर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवारी विरून गेला होता. परिणामी, राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

पुण्याचा पाराही 40 अंशांवर
पुण्यात मंगळवारीही तापमान 40 अंश नोंदविले गेले. मार्चमध्ये सहसा चाळिशीपर्यंत तापमान जात नाही, पण यंदा मात्र आताच तापमानाने चाळिशी गाठली आहे. यापूर्वी पुण्यात 2017 मध्ये मार्चमध्ये तापमान 40.1 अंश सेल्सियअस नोंदविले गेले होते.तसेच 1892 मध्ये सुद्धा मार्चमध्ये पुण्याचे तापमान विक्रमी 42 अंश नोंदविले गेले होते. त्यात आता 2019ची भर पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.