कोल्हापूर – गेल्या आठ दिवसांमध्ये राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे मृत्यू होण्यामागे नेमकं काय कारण आहे याचं डेथ ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज दिली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले गेल्या आठ ते दहा दिवसांमध्ये राज्यभरात अनेक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. गेल्या महिनाभराच्या तुलनेत आठ दिवसांमध्ये मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे.
मात्र हे मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे होतात याचं मूळ शोधण्यासाठी डेथ ऑडिट करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच डेथ ऑडिट झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल आणि नेमके कोणते औषध उपचार करणे गरजेचे आहे हेही लक्षात येईल असं त्यांनी सांगितला आहे.